ग्रामीण भागाची दहा भागात विभागणी करून विभागनिहाय बैठका

0
3

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील ग्रामीण भागाची दहा भागात विभागणी करून विभागनिहाय बैठका घेण्याचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेस चाळीसगाव तालुक्याच्यावतीने केले आहे. चाळीसगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘विजय संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पक्षाचे प्रदेश सरचिटणीस माजी आ. राजीव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी संघाचे चेअरमन शशी साळुंखे, ज्येष्ठ नेते प्रदीप देशमुख, दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, बाजार समितीचे संचालक दिनेश पाटील, ईश्‍वर ठाकरे, कैलास सूर्यवंशी, सतीश दराडे, भास्कर पवार, भगवान पाटील, मंगेश पाटील, श्‍याम देशमुख, दीपक पाटील, रामचंद्र जाधव, छगन पाटील, बाजीराव दौंड, भूषण पाटील, भैय्यासाहेब पाटील, मोहित भोसले, शुभम पवार, सुरेश पगारे, अजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बूथ सक्षमीकरण तसेच गावातील प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये सुसंवाद समन्वय व येणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी सूक्ष्म नियोजन करून प्रत्येक बुथवर बहुमत घेण्याचा निर्धार करण्यात येत आहे.

चाळीसगाव तालुक्यात वाढती गुंडगिरी, अवैध व्यवसाय, गुटखा, गांजा अगदी ड्रग्सपर्यंत गेलेला विषय, पिढीला व्यसनाधीन करणारी यंत्रणा, अल्पश्रमात पैसा कमविण्याची लावलेली स्पर्धा यातून वाढणारी गुंडगिरी, शेतमालाला दुधाला मिळणारा भाव अशा सर्व विषयांवर पुढील महिन्यांपासून जनजागृती यात्रा काढण्याचा निर्धार प्रत्येक बैठकीत करण्यात आला. भाजपकडून तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांबाबत गैरसमज पसरविण्याचे काम सुरू आहे. त्याबाबतही चर्चा करण्यात येत आहे.

पाच विभागांच्या बैठका पूर्ण झाल्या असून हजारोंवर प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद होत आहे. पुढील पाच विभागात अजून तितक्याच प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात येईल. पुढील येणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी पक्ष सक्षमरित्या मैदानात उतरुन विजय संपादन करेल, असा आत्मविश्‍वास त्या माध्यमातून पदाधिकारी व्यक्त करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here