पहाटेच्या मंगल आरतीने पद्मालय मंदिर दुमदुमले
साईमत/ जळगाव / प्रतिनिधी
अंगारकी चतुर्थीच्या पावन पर्वानिमित्त जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान असलेल्या पद्मालय येथे भक्तीचा महापूर उसळला. पहाटे ४ वाजता अत्यंत मंगलमय वातावरणात जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते श्री गणरायाचा अभिषेक व विधिवत महापूजा संपन्न झाली. या प्रसंगी मंदिर परिसरात भक्तिमय वातावरणाची अनुभूती सर्वत्र जाणवत होती.
अद्वितीय गणेश दर्शनाची परंपरा जपणारे पद्मालय
पद्मालय हे गणपतीचे अत्यंत प्राचीन आणि वैशिष्ट्यपूर्ण स्थान म्हणून ओळखले जाते. डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही सोंडेचे गणपती एकाच ठिकाणी विराजमान असलेले हे देशातील एकमेव मंदिर असल्याने या स्थानाचे धार्मिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या पहाटेच्या आरतीने मंदिर परिसरात भक्तीचा दरवळ अधिकच दरवळला.
विकासकामांचा घेतला सविस्तर आढावा
पद्मालय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या निमंत्रणावरून जिल्हाधिकारी रोहन घुगे पूजेसाठी उपस्थित होते. महापूजा संपन्न झाल्यानंतर त्यांनी मंदिर परिसराची पाहणी करत ऐतिहासिक वारसा जपत सुरू असलेल्या विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी देवस्थान ट्रस्टतर्फे शाल व श्री गणरायाची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
भाविकांच्या सोयीसाठी विशेष नियोजन
उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी ट्रस्टतर्फे विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सावलीसाठी मंडप उभारण्यात आले असून पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था आणि कुलर्सची सोय करण्यात आली आहे.
या मंगल प्रसंगी तहसीलदार गोपाल पाटील, विश्वस्त आनंदराव पाटील, भिका पाटील, गोकुळ देशमुख, डॉ. पांडुरंग पिंगळे, तसेच जैन इरिगेशनचे अनिल जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पुजारी गणेश वैद्य व केशवराव पुराणिक यांनी विधी पार पाडला. जिल्हाधिकाऱ्यांच्या पूजेनंतर मंदिर सर्वसामान्य भाविकांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात आले.
