साईमत / पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरात भ्रष्टाचाराच्या आरोपांना वाचा फोडणाऱ्या तक्रारदारावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणामुळे संपूर्ण शहरात तीव्र खळबळ उडाली आहे. तसेच स्थानिक राजकीय वर्तुळातही तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
सांगवी ते बोपोडी परिसराला जोडणाऱ्या सुमारे 32 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या पुलाच्या तसेच त्याच्या सुशोभीकरणासाठी झालेल्या अंदाजे 19 कोटी रुपयांच्या खर्चावरून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या कामातील कथित अनियमितता आणि भ्रष्टाचाराबाबत सांगवी परिसरातील ‘काँग्रेच्युलेशन’ या व्हॉट्सअॅप ग्रुपवर तक्रारदार दिलीप मारुतीराव तनपुरे यांनी आक्षेप नोंदवत संबंधितांकडून स्पष्टीकरण मागितले होते.
याच वादातून राग धरून काही जणांनी तनपुरे यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शुक्रवारी सायंकाळी सुमारे 6.30 वाजण्याच्या सुमारास माकन चौक परिसरात ही घटना घडली. दुचाकीवरून जात असताना काही आरोपींनी त्यांना अडवून लोखंडी रॉड व चाकूने हल्ला केला.
या हल्ल्यात तनपुरे गंभीर जखमी झाले असून, सुदैवाने ते थोडक्यात बचावले आहेत. त्यांना तत्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिषेक नारायण शेगडे आणि अंकीतकुमार उर्फ कल्लू राजेश मोर्या यांना अटक करण्यात आली आहे. तर ओम गणपत ताकवणे, ओम आणि नैतिक हे तीन संशयित अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
दरम्यान, हल्ल्यापूर्वी तक्रारदारांना व्हॉट्सअॅपवरून धमकीवजा संदेश पाठवण्यात आल्याची बाबही तपासात समोर आली आहे. “तुम्ही विरोध करा, आम्ही विरोध केला तर सहन करा,” असा इशारा त्या संदेशात असल्याचे सांगितले जात आहे.
या गंभीर घटनेचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, या प्रकरणामुळे भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
