जळगाव शहरातील नेताजी सुभाषबाबू चौकाने घेतला मोकळा श्वास; महापौरांनी केली पायी पाहणी
साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी आणि मुख्य बाजारपेठ परिसर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेने आता कंबर कसली आहे. मनपाच्या अतिक्रमण विभागाने दोन दिवसांपूर्वीच नेताजी सुभाषचंद्र बोस चौक परिसरातील मोठे अतिक्रमण हटवून या चौकांना मोकळा श्वास करून दिला होता. या पार्श्वभूमीवर, मंगळवारी संध्याकाळी महापौर दीपमाला काळे यांनी स्वतः नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, घाणेकर चौक ते प्रकाश मेडिकल चौकापर्यंतच्या परिसराची पायी चालत पाहणी केली आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश दिले.
या पाहणी दौऱ्यात स्थायी समिती सदस्य अरविंद देशमुख, महापालिकेचे उपायुक्त पंकज गोसावी, अतिक्रमण विभागाचे संजय ठाकूर यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
’पिवळ्या पट्ट्या’च्या आतच करावा लागेल व्यवसाय
दोन दिवसांपूर्वी केलेल्या कारवाईनंतर आता या परिसरातील हॉकर्सचे पुनर्वसन शिस्तबद्ध पद्धतीने केले जाणार आहे. हॉकर्सना व्यवसायासाठी विशिष्ट जागा निश्चित करून तिथे पिवळे पट्टे आखून दिले जातील. हॉकर्सनी या पिवळ्या पट्ट्यांच्या आतच बसून आपला व्यवसाय करायचा आहे. जे हॉकर्स पट्ट्याबाहेर येऊन रस्त्यावर अतिक्रमण करतील, त्यांचा माल जप्त करून कडक कारवाई केली जाईल, अशी थेट तंबी महापौरांनी उपस्थित हॉकर्स बांधवांना दिली.
पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था; पुतळा परिसर राहणार मोकळा
वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने आणि पुतळ्या जवळील अतिक्रमणाबाबत महापौरांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत:
नो-अतिक्रमण झोन: नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याभोवती कोणालाही व्यवसाय करण्यास बसू दिले जाणार नाही. पुतळ्याच्या आजूबाजूचे सर्व अतिक्रमण पूर्णपणे काढले जाईल.
पार्किंग पट्टे: वाहनधारकांसाठी पार्किंगचे स्वतंत्र पट्टे आखून दिले जातील. पट्ट्याबाहेर पार्क केलेल्या दुचाकींवर तात्काळ कारवाई केली जाईल.
पर्यायी जागा: सुभाषचंद्र बोस पुतळ्यापासून महालक्ष्मी मंदिरापर्यंत एक ‘लेन’ तयार करून तेथे हॉकर्सला जागा देता येईल का, याची चाचपणी सध्या मनपाकडून सुरू आहे.
सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत दाणाबाजार परिसरात अवजड वाहनांना बंदी असतानाही काही वाहने येत असल्याबद्दल नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. यावर महापौर कमालीच्या आक्रमक झाल्या. “बंदीच्या वेळेत येथे अवजड वाहने कशी येतात? नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागता कामा नये,” अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच, अवैध वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी शहर वाहतूक शाखा आणि आरटीओ विभागाला तात्काळ पत्र देण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.
दाणाबाजार भागात उघड्यावर पडलेला कचरा पाहून महापौरांनी तीव्र संताप व्यक्त केला. “स्वच्छता राखणे ही केवळ मनपाची नाही, तर प्रत्येकाची जबाबदारी आहे,” असे सांगत त्यांनी व्यापाऱ्यांसाठी खालील नियम निश्चित केले:
१. दाणा बाजारातील प्रत्येक दुकानदाराने आणि चौकातील हॉकर्सने आपल्या दुकानाजवळ डस्टबिन (कचराकुंडी) ठेवणे बंधनकारक आहे.
२. सर्व कचरा उघड्यावर न टाकता स्वतःच्या डस्टबिनमध्येच गोळा करावा लागेल.
३. व्यावसायिकांच्या सोयीसाठी या भागात दिवसातून शक्य झाल्यास दोन वेळा घंटागाडी पाठवण्याची व्यवस्था केली जाईल.
४. दाणाबाजार व्यापारी असोसिएशनने आणि हॉकर्स बांधवांनी जळगाव शहर सुंदर आणि स्वच्छ ठेवण्यासाठी मनपा प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
या पाहणी दौऱ्यादरम्यान पथविक्रेता समितीचे मोहन तिवारी, दाणा बाजार व्यापारी असोसिएशनचे अशोक राठी यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक व्यापारी, हॉकर्स आणि नागरिक उपस्थित होते. मनपाच्या या कडक भूमिकेमुळे बाजारपेठेत आता शिस्त लागण्याची चिन्हे दिसत आहेत.
