नात्यातील ४७ वर्षीय व्यक्तीकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार सावदा पोलिसांकडून गुन्हा दाखल
साईमत/सावदा (ता. रावेर) / प्रतिनिधी :
रावेर तालुक्यातील एका गावात नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली असून, सख्ख्या मावसाकडून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित मुलगी यांचे नाते मावसा असे असून, ४७ वर्षीय व्यक्तीने या नात्याचा गैरफायदा घेत गेल्या काही महिन्यांपासून पीडितेवर दबाव टाकून वारंवार बळजबरीने अत्याचार केल्याचा आरोप आहे. हा प्रकार १२ नोव्हेंबर २०२५ ते २९ मे २०२६ या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दीर्घकाळ सुरू असलेल्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून अखेर पीडित मुलीने धाडस दाखवत सावदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच पोक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे.
या प्रकरणात भारतीय न्याय संहिता कलम ६४(२)(एफ), ३५१(२) तसेच पोक्सो कायद्यातील कलम ४, ६ आणि ५(एन) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सावदा पोलीस ठाण्यातील अधिकारी करीत आहेत.
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांकडून आरोपीवर कठोरात कठोर कारवाईची मागणी होत आहे.
