धानोरा आरोग्य केंद्रात शवविच्छेदन गृहाची मागणी

0
10

साईमत, धानोरा, ता. चोपडा : वार्ताहर

सातपुड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या धानोरा गावात एकमेव प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. लाखो रुपये खर्चुन बांधकाम झालेल्या केंद्रात शवविच्छेदन गृहाचे बांधकामच झालेले नाही. त्यामुळे मृत्यूनंतरही शवाची (मयत शरीराची) अवहेलना झाल्याच्या अनेक घटना परिसरात घडल्या आहेत. त्यामुळे धानोरा आरोग्य केंद्रात शवविच्छेदन गृह तयार करण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे.

धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत चार उपकेंद्र येतात. त्यात धानोरा, पंचक, देवगाव, बिडगाव यांचा समावेश आहे. या उपकेंद्राला लागुनच ११ गावे, ११ वस्ती, पाडे जोडलेली आहेत. त्याच ठिकाणी लागूनच सातपुडा पर्वतात वसलेले अतीदुर्गम भागातील वस्त्यांवर, पाड्यावर व गावात अनेकवेळा अप्रिय घटना घडतात. त्यात विषबाधित, जळीत, अपघाती, बुडून मृत्यू अशा घटना घडतात. अशावेळी शवाला धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून अडावदला तिथे वैद्यकीय अधिकारी असेल तरच शवविच्छेदन होते, अन्यथा थेट चोपडा, यावल, जळगाव अन्य ठिकाणी ते न्यावे लागते. त्यात मात्र त्या शवाचा प्रवास होत असतो. त्यामुळे मृत्यूनंतरचा प्रवासही थांबत नाही. आधीच घरातील व्यक्ती मृत्यू पावल्यावर नातेवाईकांना मोठा आघात बसलेला असतो. त्यात भर पडते ते शव घेऊन जाण्यासाठीच्या स्थितीची याच कारणामुळे नातेवाईकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. दुःखात परत हे असे अवहेलनासारखे चित्र डोळयासमोर उभे राहते. त्यामुळे धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन गृह उभारण्याची गरज निर्माण झालेली आहे. यासाठी जिल्हा आरोग्य विभाग, लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देऊनही मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी जोर धरत आहे. धानोरा हे गाव व्यापारी, शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक दृष्ट्या तालुक्यात मोठे आहे. त्या दुष्टीने याठिकाणी शवविच्छेदन गृह उभारण्याची खरी गरज येऊन ठेपली आहे.

ज्यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम झाले. त्यावेळी शवविच्छेदन गृह बांधण्यात आले नाही. आपल्याकडे सफाई कामगार आहे. शवविच्छेद गृह झाल्यास प्रशिक्षण देऊन शवविच्छेदन होऊ शकते, असे धानोऱ्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.उमेश कवडीवाले यांनी सांगितले.

धानोरा गावाची लोकसंख्या वीस हजाराच्यावर आहे. याच गावाला लागुन अनेक गावे, वाडे, वस्त्या, दुर्गम आदिवासी भाग आहे.त्यामुळे शवविच्छेदन गृहाची उभारणी धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात होणे गरजेचे आहे. जेणेकरुन परिसरातील ग्रामस्थ, परिवार, आप्तेष्ट यांचे होणारे हाल थांबतील, अशा प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते जगदीश भोई यांनी दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here