साईमत जळगाव प्रतिनिधी
दीपस्तंभ मनोबल प्रकल्पातील दिव्यांग, अनाथ, वंचित घटकांतील विदयार्थ्यांसोबत दरवर्षी मनोबल येथे दिवाळी साजरी करण्यात येते.जे डोळ्याने प्रकाश बघू शकत नाही अश्या अंध विद्यार्थ्यांमधील ज्ञानरूपी प्रकाशाचे पूजन करण्यासाठी ‘प्रकाशपुजन’ या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. या वर्षीही ‘प्रकाशपुजन’ कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत मनोबल प्रकल्पात झाला.
कार्यक्रमात दीपस्तंभ जळगाव व पुणे येथील दिव्यतेज टीम ने गायन व वादन सादरीकरण करीत सुरेल मैफल सजवली.मनोबलचे श्याम मिश्रा, आशा वरांगडे, दिव्यता अधिकारी, शेख नाझनीन, धनश्री वाघ यांनी विविध गाण्याचे सादरीकरण केले तर मानसी पाटील, ईशान नाईक, ममता नाकतोडे, उत्कर्षा गाडे यांनी नृत्य सादर केले. चैतन्य पानवलकर याने बासरी वादन तर फैयाज अत्तार याने माऊथ ऑर्गन वर गीत सादर केले.एक पाय नसणाऱ्या मानसीने अतिशय उत्तम नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांचे सादरीकरण पाहुन उपस्थित भारावून गेले. विद्यार्थ्यांचे पूजन शोभा अवचट, कल्पना भोळे, डॉ.मनीषा दमाणी, मानसी गव्हाणकर,जयश्री महाले यांनी केले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कपडा व्यवसायिक ओमप्रकाश केसवनी, नयनतारा बाफना, कवयित्री बहिणाबाई चौधरी उ.म.विद्यापीठाचे कुलसचिव विनोद पाटील, जळगाव जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील, वन अधिकारी समाधान सोनवणे, परेश यादव (कॅनडा), डॉ.नितीन राठी उपस्थित होते.
पंचशील ग्रुपचे प्रशांत चोरडिया यांनी प्रकाश पूजन कार्यक्रमाच्या भोजनासाठी देणगी दिली होती. अमिषा डाबी यांच्या कडून सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार नवीन कपडे घेण्यात आले. तर दिवाळीच्या सजावटीची जबाबदारी डॉ.रेखा महाजन मित्र परिवाराने स्वीकारली होती.
या प्रसंगी उत्कृष्ट काम केल्याबद्दल मनोबल प्रकल्पातील सहकारी अनुप चौधरी आणि योगिता महाजन यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीता संघवी यांनी केले. सूत्र संचलन पंकज गिरासे आणि माउली अडकूर यांनी तर आभार श्रीकांत लासूरकर यांनी मानले.संस्थेचे सचिव लक्ष्मण सपकाळे, संचालक डॉ.रुपेश पाटील, डॉ.रवी महाजन, परेश भाई शहा, आर.डी.पाटील, यजुर्वेंद्र महाजन उपस्थित होते.