मेन रोडवरील ‘गोल्ड हाऊस’मध्ये धाडसी चोरी; ३ संशयित सीसीटीव्हीत कैद, पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह
साईमत -चोपडा- प्रतिनिधी |
शहरातील अत्यंत गजबजलेली आणि मुख्य बाजारपेठ असलेल्या मेन रोडवर आज एक धक्कादायक आणि तितकीच खळबळजनक घटना घडली. येथील नामांकित ‘गोल्ड हाऊस’ या सोन्याच्या दुकानातून तीन सराईत चोरट्यांनी दुकानदाराची नजर चुकवून तब्बल ८१ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले. भरदिवसा घडलेल्या या ‘डिजिटल’ हातचलाखीमुळे चोपड्यातील व्यापारी वर्गासह नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. चोरीला गेलेल्या या दागिन्यांची बाजारभावानुसार एकूण किंमत ६ लाख ४८ हजार रुपये आहे.
नजर हटली अन… ३ संशयितांनी डागला डल्ला!
मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, नेहमीप्रमाणे दुकानात ग्राहकांची वर्दळ असताना तीन संशयित इसम दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने ‘गोल्ड हाऊस’मध्ये शिरले. त्यांनी सुरुवातीला दुकानदाराला वेगवेगळ्या डिझाईन्सचे दागिने दाखवण्याची गळ घातली. दुकानदार त्यांना विविध दागिने दाखवण्यात व्यस्त असताना, या तिघांनी अत्यंत पद्धतशीरपणे दुकानदाराचे लक्ष विचलित केले.
दुकानदाराची नजर किंचित बाजूला होताच, काउंटरवर ठेवलेले ३ ग्रॅम वजनाचे एकूण २७ सोन्याचे पेंडॉल (एकूण वजन ८१ ग्रॅम) चोरट्यांनी अत्यंत हुशारीने आणि हातचलाखीने गायब केले.
हे तीनही कथित ग्राहक दुकानदाराला गुंगवून दुकानातून निघून गेले. त्यानंतर काही वेळाने दुकानदाराने काउंटरवरील दागिन्यांचा हिशोब आणि वजन केले असता, त्यात मोठी तफावत आढळून आली. संशय बळावल्याने दुकानदाराने तातडीने दुकानातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले. त्यावेळी तिन्ही चोरटे काउंटरवरून पेंडॉल चोरताना कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाल्याचे समोर आले.
खाकी ॲक्शन मोडमध्ये!
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी चेतन परदेशी आणि संदीप भोई यांनी तातडीने आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा रीतसर पंचनामा केला असून, दुकानातील सीसीटीव्ही फुटेज आपल्या ताब्यात घेतले आहे.
भरबाजारपेठेत आणि गजबजलेल्या रस्त्यावर चोरट्यांनी अशा प्रकारे बिंधास्तपणे चोरी केल्याने पोलिसांच्या गस्तीवर आणि सुरक्षेवर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सीसीटीव्हीत कैद झालेल्या त्या तीन अट्टल चोरट्यांचा माग काढून त्यांना बेड्या ठोकण्याचे आणि चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याचे मोठे आव्हान सध्या चोपडा पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
