पुण्याला गेलेल्या कुटुंबाच्या अनुपस्थितीत चोरट्यांचा डाव; कडी-कोयंडा कापून घरात शिरकाव
साईमत/ शिरसोली / प्रतिनिधी
येथील प्र. बो. परिसरातील शिक्षक कॉलनीत बंद घरावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत सुमारे पाच लाख रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज व रोख रक्कम लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्टॅम्प वेंडर राजेंद्र दौलत आंबटकर (बारी) हे पत्नीसह गेल्या शुक्रवारी (दि. १ मे) पुणे येथे गेले होते. त्यांच्या घराला कुलूप असल्याची संधी साधत चोरट्यांनी कडी-कोयंडा कापून घरात प्रवेश केला. मंगळवारी सकाळी सुमारे ७ वाजता आंबटकर कुटुंब परत आले असता, घराचा दरवाजा अर्धवट उघडा दिसला. आत प्रवेश केल्यावर घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले आणि चोरी झाल्याचे स्पष्ट झाले.
चोरट्यांनी घरातील प्रत्येक कोपरा चाचपडत धान्याच्या कोठीत लपवून ठेवलेले दागिनेही शोधून काढले. यात दोन तोळ्यांची सोन्याची मंगलपोत, दीड तोळ्याची सोन्याची चेन, ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुमके तसेच सुमारे १५ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण अंदाजे ५ लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सरपंच पती अर्जुन पवार यांनी तातडीने एमआयडीसी पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. त्यानंतर पीएसआय राहुल तायडे, प्रदीप चौधरी, धनराज गुळवे, चेतन पाटील तसेच शिरसोलीचे पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
तपासाला गती देण्यासाठी पोलीस कर्मचारी मनोज पाटील व नाना मोरे यांनी ‘चॅम्प’ या श्वान पथकाला पाचारण केले. तसेच ठसे तज्ज्ञ एपीआय पांडुरंग फळ व पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन चौधरी यांनी घटनास्थळावरून ठसे गोळा केले आहेत.
दरम्यान, या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत. परिसरात वाढत्या घरफोड्यांमुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे.
