मिळालेल्या खात्यावर दादा भुसे नाराज दुय्यम खाते मिळाल्याने मुख्यमंत्री शिंदेंवर नाराजी?

0
3

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी :

शिंदे-फडणवीस यांनी सत्ता स्थापन केल्यानंतर तब्बल ३८ दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार केला. यानंतर काल मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले. शिंदे-फडणवीस सरकारच्या  खातेवाटपात अनेक धक्कादायक बदल दिसल्याचे बोलले जात आहे. खातेवाटपानंतर शिंदे गटात नाराजीनाट्य वाढल्याची चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. या अनपेक्षित बदलामुळे शिंदे गटातील बंडखोर आमदार आणि मंत्री दादा भुसे  नाराज असल्याची चर्चा आहे.

शिवसेनेत बंडखोरी करून शिंदे गटात गेलेल्या काही मंत्र्यांची मात्र निराशा झाल्याचे दिसत आहे. दादा भुसे हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये कृषी मंत्री होते. मात्र शिंदे सरकारमध्ये भुसे यांच्यावर बंदरे व खनिकर्म खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. भुसे यांच्याकडे आधीच्या तुलनेत दुय्यम खाते दिल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर दादा भुसे हे नाराज असल्याची चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. आगामी काळात नाराज आमदार आणि मंत्र्यांची समजूत काढण्यासाठी एकनाथ शिंदे यांना तारेवरची कसरत करावी लागण्याची शक्यता आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार या दिग्गज भाजप नेत्यांना धक्का देण्यात आला आहे. काहींना अनपेक्षितपणे महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत. चार-पाच दिवसांपूर्वी माध्यमांमधून खातेवाटप जाहीर झाले तेव्हा तुमची यादी खोटी ठरेल, असे सूचक उद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले होते. या खातेवाटपावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच वरचष्‍मा दिसून आला आहे. फडणवीस यांच्याकडे सर्वात महत्त्‍वाची म्‍हणजे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती देण्यात आली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here