नशिराबाद पोलिसांची धडाकेबाज कारवाई
साईमत नशिराबाद प्रतिनिधी :
बसस्थानक परिसरात हातात गावठी पिस्तूल घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला नशिराबाद पोलिसांनी रविवारी (दि. १९ एप्रिल) सायंकाळी सुमारे ६ वाजता मोठ्या शिताफीने अटक केली. या कारवाईमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असले तरी पोलिसांच्या तत्परतेमुळे परिस्थिती नियंत्रणात आली.अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव कमलाकर प्रभाकर महाजन (वय ३६, रा. नशिराबाद) असे आहे.
मिळालेल्या माहितीनंतर तात्काळ कारवाई
नशिराबाद बसस्थानक परिसरात एक इसम गावठी पिस्तूल घेऊन नागरिकांमध्ये भीती निर्माण करत असल्याची माहिती नशिराबाद पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांना मिळाली. माहिती मिळताच त्यांनी तात्काळ हालचाल करत पोलीस उपनिरीक्षक हरीष पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाला कारवाईचे आदेश दिले.
यानंतर पोलिसांनी बसस्थानक परिसरात सापळा रचून अचानक छापा टाकला. या कारवाईत संशयित आरोपी कमलाकर महाजन याला जागीच ताब्यात घेण्यात आले.
अंगझडतीत गावठी कट्टा जप्त
आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक लोखंडी, चंदेरी रंगाचा व काळ्या प्लास्टिकच्या मूठीचा गावठी कट्टा आढळून आला. पोलिसांनी तो तात्काळ जप्त केला असून याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र ठाकरे हे करत आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.या धडाकेबाज कारवाईत नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हरीष पाटील, तसेच चंद्रकांत पाटील, गुणवंत देशमुख, भरत बाविस्कर, पंकज सोनवणे, सागर बिडे, प्रविण लोहार आणि समीर सैय्यद यांचा समावेश होता.
परिसरात दिलासा, पोलिसांचे कौतुक
बसस्थानक परिसरात सराईत गुन्हेगाराकडून सुरू असलेली दहशत पोलिसांनी वेळेत मोडून काढल्याने नागरिकांनी दिलासा व्यक्त केला असून, पोलिसांच्या या तत्पर व प्रभावी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
