दहा वर्षांपासून अविरत उपक्रम; दररोज १५० ते ३०० लिटर पाण्याची सेवा
साईमत जळगाव प्रतिनिधी
कडक उन्हामुळे हैराण झालेल्या प्रवाशांसाठी जळगाव शहरातून एक दिलासादायक उपक्रम पुढे आला आहे. जळगाव येथील नवीन बसस्थानकात गेल्या दहा वर्षांपासून ‘जलसेवा’ हा उपक्रम अत्यंत निष्ठेने आणि सातत्याने राबविला जात असून, हजारो प्रवाशांची तहान भागवण्याचे महत्त्वपूर्ण काम यामार्फत केले जात आहे.
जळगाव जिल्हा माहेश्वरी समाज, प्रेम फाउंडेशन आणि कलंत्री परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जात आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेची सुरुवात होताच, म्हणजेच २५ मार्च ते १ जून या कालावधीत बसस्थानकावर येणाऱ्या प्रवाशांसाठी थंड पाण्याची मोफत व्यवस्था करण्यात येते. रोजच्या धावपळीत आणि उन्हाच्या झळा सहन करत प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी ही सेवा मोठा दिलासा ठरत आहे.
या उपक्रमाबाबत माहिती देताना योगेश कलंत्री यांनी सांगितले की, दररोज साधारण १५० ते ३०० लिटर पाणी प्रवाशांना मोफत उपलब्ध करून दिले जाते. जळगावातील वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर हा छोटासा प्रयत्न अनेकांसाठी जीवनदायी ठरत आहे.
गेल्या दशकभरापासून कलंत्री परिवाराने जोपासलेली ही समाजसेवेची परंपरा आजही तितक्याच उत्कटतेने सुरू आहे. उन्हाच्या कडाक्यात प्रवाशांसाठी आधार बनलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, अशा उपक्रमांमुळे समाजात माणुसकीचा ओलावा टिकून राहतो, असे मत व्यक्त होत आहे. तसेच इतर सामाजिक संस्थांनीही अशा प्रकारच्या सेवाभावी उपक्रमातून प्रेरणा घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
