जिल्ह्यात २६९७ शेतकऱ्यांना ३ कोटी २२ लाख ३ हजारांची भरपाई
जळगाव (प्रतिनिधी)-
नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या धुळे व जळगाव जिल्ह्यातील २६९७ शेतकऱ्यांसाठी भरपाईची रक्कम प्राप्त झाली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच ३ कोटी २२ लाख ३ हजारांची रक्कम जमा करण्यात येणार आहे.
नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे यावल व रावेर तालुक्यातील पिकांना फटका बसला होता. केळी उत्पादक भागातील केळीच्या बागा पाऊस आणि गारांच्या माऱ्याने कोलमडून पडल्या होत्या. रब्बीच्या पिकांचेही नुकसान झाले होते. हरभरा, गहू, तूर, पपईचेही नुकसान झाले होते. अनेक ठिकाणी सीसीआय केंद्रावर शेतकऱ्यांनी बैलगाड्यांमध्ये आणलेला कापूसदेखील ओला झाल्याने त्यांना नुकसान सहन करावे लागले होते.
यावल तालुक्यातील भालोद, बामणोद, आमोदा, म्हैसवाडी, राजोरा, बोरावल तर रावेर तालुक्यातील सावद, चिनावल, वाघोड कोंद यासह अनेक गावांना पावसाचा फटका बसला होता.
रावेर व यावल तालुक्यात ११०८ हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले होते. दोन्ही तालुक्यांतील २९ गावातील १४०७ शेतकरी बाधित झाल्याचा अहवाल कृषी विभागाने सादर केला होता. यात सर्वाधिक ५८८ हेक्टरवरील हरभऱ्याचे तर ३८४ हेक्टरवरील केळीचे नुकसान झाले होते. तूर, गहू व मक्याच्या पिकांचे काहीअंशी नुकसान झाले होते. जिल्हा प्रशासनाने अहवाल सादर केल्यानंतर १९ मार्चरोजी ३ कोटी २२ लाख ३ हजारांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार अाहे.