साईमत न्यूज नेटवर्क –
नाशिक : यंदा अल निनोच्या प्रभावामुळे मान्सून लांबण्याची आणि सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट ओढवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जलसंपदा विभागाने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याचे निर्देश दिल्यानंतर नाशिक महापालिकेनेही पाणीपुरवठ्याबाबत विशेष उपाययोजनांची तयारी सुरू केली आहे.
सध्या महापालिकेकडे १२ ऑगस्टपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे ऑगस्टअखेरपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी १५ ते २० टक्के पाणीकपात करण्याचा किंवा गंगापूर धरणातील अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध करून घेण्याचा पर्याय प्रशासनाकडून विचाराधीन आहे. यासंदर्भातील अंतिम निर्णय महापौर, आयुक्त, उपमहापौर आणि सर्व गटनेत्यांच्या बैठकीत घेतला जाणार आहे.
नाशिक शहराचा पाणीपुरवठा मुख्यतः गंगापूर धरणावर अवलंबून असून शहराच्या एकूण गरजेपैकी सुमारे ७५ टक्के पाणी येथून मिळते. याशिवाय मुकणे आणि दारणा धरणांतूनही पाणीपुरवठा केला जातो. महापालिकेने ऑक्टोबर २०२५ ते जुलै २०२६ या कालावधीसाठी ६४०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाची मागणी केली होती. जिल्हा प्रशासनाने ती मंजूर केली असली तरी आता हेच पाणी ३१ ऑगस्टपर्यंत पुरविण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.
सध्या शहराला दररोज सुमारे ६०० दशलक्ष लिटर म्हणजेच २१ दशलक्ष घनफूट पाणीपुरवठा केला जातो. दरम्यान, १३ जून रोजी जारी करण्यात आलेल्या शासन आदेशात अल निनोमुळे यंदा पर्जन्यमानात घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे धरणांतील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच राज्यातील सर्व धरणांमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक साठा राखून ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून सिंचनासाठी पाणी सोडण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.
गंगापूर धरणात अतिरिक्त पाणी उपलब्ध करण्याचा पर्याय
पाणीकपात टाळण्यासाठी गंगापूर धरणातील अतिरिक्त सुमारे ६०० दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध करून घेण्यासाठी चर खोदण्याच्या पर्यायाचीही प्रशासनाकडून तपासणी सुरू आहे. मात्र हा पर्याय व्यवहार्य ठरला नाही तर पाणीकपात अटळ मानली जात आहे.
अल निनोच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, तर मुंबईत आठवड्यातून एक दिवस पाणीकपात लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेनेही संभाव्य पाणीकपातीचे संकेत दिले आहेत.
“जलसंपदा विभागाने ३१ ऑगस्टपर्यंत पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महापौर, उपमहापौर, आयुक्त आणि सर्व गटनेत्यांशी चर्चा करून पाणीकपातीबाबत अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल,” अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर यांनी दिली.
उपशीर्षक : १२ ऑगस्टपर्यंतच पाणीसाठा; १५ ते २० टक्के कपात किंवा अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध करण्याच्या पर्यायांवर प्रशासनाचा विचार
