४ मे रोजी होणाऱ्या सभेत ४७८ दिव्यांगांना अर्थसहाय्य, निधीवाढीसह पायाभूत सुविधांवर महत्त्वाचे निर्णय अपेक्षित
साईमत/ जळगाव / प्रतिनिधी
जळगाव शहर महानगरपालिकेच्या स्थायी समितीची महत्त्वपूर्ण सभा येत्या सोमवार, दि. ४ मे रोजी सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली असून, या बैठकीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे. शहरातील प्रलंबित विकासकामे, सामाजिक कल्याण योजनांची अंमलबजावणी आणि प्रशासकीय निर्णय यावर या सभेत सखोल चर्चा होणार आहे.
या बैठकीत विशेषतः दिव्यांग बांधवांच्या कल्याणाचा मुद्दा अग्रक्रमाने घेण्यात आला आहे. शहरातील प्रलंबित ४७८ दिव्यांग अर्जदारांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या दिव्यांगांसाठी असलेली दीड कोटी रुपयांची वार्षिक खर्च मर्यादा अपुरी ठरत असल्याने, ती ५० लाखांनी वाढवून दोन कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मांडला आहे. या निर्णयामुळे अनेक पात्र लाभार्थींना मोठा दिलासा मिळणार आहे.
याशिवाय, शहरातील पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणावरही या सभेत भर दिला जाणार आहे. प्रभाग क्रमांक २ मधील कांचन नगर व पवन नगर परिसरातील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी सुमारे ३० लाख रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव आहे. तसेच, पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी पॉटहोल मशीनच्या साहाय्याने दुरुस्तीचे नियोजन करण्यात आले असून, यासाठी २३ लाख रुपयांच्या डांबर खरेदीच्या प्रस्तावालाही मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
शहरातील जलपुरवठा व्यवस्थेला चालना देण्यासाठी विविध भागांत नवीन जलवाहिन्या टाकण्याच्या कामांवरही चर्चा होणार आहे. याचबरोबर, महापालिकेच्या ताफ्यातील वाहनांसाठी आवश्यक डिझेल खरेदीसंदर्भातील प्रस्तावही सभेसमोर ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, प्रशासनातील पारदर्शकता वाढवण्यासाठी लेखा परीक्षण विभागाचे साप्ताहिक अहवाल तसेच आयुक्तांनी विविध कामांसाठी केलेल्या संविदांची माहिती सभेत पटलावर मांडली जाणार आहे. या सर्व विषयांवर होणाऱ्या चर्चेनंतर शहर विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सोमवारच्या या निर्णायक बैठकीत होणाऱ्या निर्णयांकडे प्रभाग २ मधील नागरिकांसह अर्थसहाय्याच्या प्रतीक्षेत असलेल्या दिव्यांग बांधवांचे विशेष लक्ष लागले आहे.
