भरधाव वेग ठरला जीवघेणा दोन तरुणांचा मृत्यू, १०८ सेवेच्या विलंबाने संतापाची लाट
साईमत /नवापूर/ प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील खांडबारा गावाजवळील भादवड पुलानजीक रविवारी दोन मोटारसायकलींची समोरासमोर झालेली भीषण धडक दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळवून गेली. या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर आणखी एक युवक गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की दोन्ही मोटारसायकलींचा अक्षरशः चुराडा झाला. या दुर्घटनेमुळे लहान कक्करण आणि शेणीपाणी-बडीपाडा या गावांमध्ये शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंद्रसिंग अर्जुन वळवी (वय २४, रा. शेणीपाणी-बडीपाडा) हे मोटारसायकलने खांडबाराकडून येत होते. त्याचवेळी भूषण देविदास पाडवी (वय २३, रा. लहान कक्करण) हे दुसऱ्या मोटारसायकलवरून नंदुरबारच्या दिशेने जात असताना भादवड पुलाजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेचा आवाज दूरवर ऐकू गेल्याने परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातात त्यांच्यासोबत असलेला आणखी एक युवक गंभीर जखमी झाला.
घटनेनंतर नागरिकांनी जखमीला तातडीने वैद्यकीय मदत मिळावी म्हणून १०८ रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. मात्र, रुग्णवाहिका वेळेत घटनास्थळी न पोहोचल्याने उपस्थित नागरिकांनी संताप व्यक्त केला. अखेर स्थानिकांनी प्रसंगावधान दाखवत जखमीला खासगी वाहनातून खांडबारा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचारानंतर त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी नंदुरबार येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
या घटनेनंतर ग्रामीण भागातील आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अपघातानंतर वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत खांडबारा परिसरात कायमस्वरूपी १०८ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. दुर्गम भागातील नागरिकांना तातडीची वैद्यकीय सेवा वेळेत मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी असून त्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.
अपघाताची माहिती मिळताच खांडबारा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, या दुर्दैवी दुर्घटनेने संपूर्ण परिसर हळहळला असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भादवड पुल परिसरात वारंवार घडणारे अपघात, आपत्कालीन वैद्यकीय सेवेतील विलंब आणि ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांची अपुरी उपलब्धता हे गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. या पार्श्वभूमीवर अपघातप्रवण ठिकाणी आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना, तत्पर आरोग्य सेवा आणि रुग्णवाहिका सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
