साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
जळगाव जिल्ह्यातील चिंचोली येथे उद्योगांना दर्जेदार आणि अखंड वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात आलेल्या ३३ केव्ही महावितरण सबस्टेशनचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. जिल्हा नियोजन समितीच्या (DPDC) माध्यमातून साडेचार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून हे काम पूर्ण करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, “चिंचोली आणि परिसरातील वाढत्या औद्योगिक गरजा लक्षात घेऊन हे सबस्टेशन उभारण्यात आले आहे. यामुळे वीज तुटवड्याची व ट्रिपिंगची समस्या मोठ्या प्रमाणात मार्गी लागेल. नवीन उद्योगांना याचा मोठा दिलासा मिळणार असून, स्थानिक पातळीवर उद्योगवाढीला व रोजगाराला चालना मिळेल.”भविष्यात उद्योगांचा विस्तार होऊन विजेची मागणी वाढल्यास आणि सध्याची क्षमता अपुरी पडल्यास, शासनाच्या वतीने आणखी नवीन सबस्टेशन उभारले जाईल, अशी ग्वाहीही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.
अवाजवी वीजबिलांच्या तक्रारींची दखल घ्या: पालकमंत्री
या कार्यक्रमादरम्यान पालकमंत्र्यांनी राज्यात राबवल्या जाणाऱ्या स्मार्ट मीटर धोरणावरही स्पष्ट भाष्य केले. शासनाच्या धोरणानुसार स्मार्ट मीटर बसवले जात असले, तरी काही ठिकाणी ग्राहकांना येणाऱ्या अवाजवी वीजबिलांच्या तक्रारींची गंभीर दखल घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. नागरिकांना योग्य व न्याय्य वीजबिलेच मिळाली पाहिजेत, यासाठी महावितरण आणि सरकारने आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
या नवीन सबस्टेशनमुळे चिंचोली औद्योगिक क्षेत्रातील वीजपुरवठा अधिक विश्वासार्ह व बळकट होणार असून, परिसराच्या आर्थिक व औद्योगिक विकासाला गती मिळणार आहे.
