अंतर्नाद प्रतिष्ठानच्या महावक्तृत्व स्पर्धेतून भविष्यात तयार होतील बालवक्ते

0
4

साईमत, भुसावळ : प्रतिनिधी

अंतर्नाद प्रतिष्ठानच्या महावक्तृत्व स्पर्धेतून भविष्यात बालवक्ते तयार होतील. अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे आयोजित महावक्तृत्व स्पर्धा बालवक्त्यांचे हक्काचे व्यासपीठ ठरले आहे, असा मान्यवरांचा सूर अंतर्नाद प्रतिष्ठान आयोजित जिल्ह्यास्तरीय महावक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात उमटला. तसेच शिवाजी महाराजांचे प्रथम गुरु जिजाबाई होत्या. त्यांनीच शिवरायांना घडविले. आपल्या मुलांशी रोज संवाद साधा. संस्कार हे करायचे नसतात तर आपल्या कृतीतूनच होत असतात. पालकांनी आपल्या मुलांचे मित्र झाले पाहिजे, अशा भावना तहसीलदार नीता लबडे यांनी व्यक्त केल्या. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी होते. प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार नीता लबडे, ताप्ती एजुकेशन सोसायटीचे चेअरमन मोहन फालक, श्रीकांत जोशी, दिनकर जावळे, सुरेश अहिरे उपस्थित होते.

अंतर्नाद प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवजयंतीनिमित्त फेब्रुवारी महिन्यात जळगाव जिल्हास्तरीय महावक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली होती. यंदा स्पर्धेचे सातवे वर्ष होते. स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील ४५९ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. प्रथम फेरी २५ फेब्रुवारीला घेण्यात आली होती. अंतिम फेरी बक्षीस वितरणापूर्वी घेण्यात आली होती. पाच गटातील २५ विजेत्यांसह सहभागी विद्यार्थी आणि शिक्षक यांना रविवारी, ३ मार्च रोजी गौरविण्यात आले. शिवजयंतीनिमित्त आयोजित महावक्तृत्व स्पर्धेतील पाच गटातील प्रत्येकी १५ विद्यार्थी यानुसार ७५ विद्यार्थ्यांची अंतिम फेरी नहाटा महाविद्यालय लायब्ररी हॉल येथे रविवारी पार पडली. परीक्षक म्हणून शैलेंद्र वासकर, प्रा.गौतम भालेराव, प्रा.संदीप नेतनराव, प्रा.महेश गोसावी, श्रीश चिपळोणकर, प्रा.निलेश गुरुचल, तृप्तीराम करणकाळ यांनी काम पाहिले.

अंतिम फेरी झाल्यानंतर बक्षीस वितरणाचा समारंभ पार पडला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रथम रोख सातशे रुपये, द्वितीय पाचशे आणि तृतीय तीनशे रुपये यासह सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पुस्तक असे बक्षिसाचे स्वरूप होते. शिक्षण आणि सामाजीक क्षेत्रात विशेष योगदान दिल्याबद्दल राजू वारके, प्रा.डॉ.श्‍यामकुमार दुसाने, आणो गोसेवक रोहित महाले यांचा अंतर्नादतर्फे सन्मानपत्र देउन गौरव करण्यात आला. त्यानंतर स्पर्धेच्या ४० परीक्षकांना सन्मानित करण्यात आले.

सन्मानपत्राचे वाचन शैलेंद्र महाजन, अमितकुमार पाटील, विक्रांत चौधरी यांनी केले. यशस्वीतेसाठी समन्वयक समाधान जाधव, सह समन्वयक अमित चौधरी, सचिन पाटील, ज्ञानेश्‍वर घुले, राजेंद्र जावळे, तेजेंद्र महाजन, चंद्रकांत सूर्यवंशी, अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख देव सरकटे, सूत्रसंचालन जीवन महाजन तर आभार प्रदीप सोनवणे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here