मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पाचोरा दौरा तूर्त स्थगित

0
3

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या कार्यव्यस्ततेमुळे जळगाव जिल्ह्यातील पहिला तालुकास्तरीय “शासन आपल्या दारी”साठी २६ ऑगस्ट रोजी होणारा पाचोरा दौरा तूर्त स्थगित झाला आहे. लवकरच नवीन तारीख जाहीर केली जाईल, अशी माहिती जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, उपजिल्हा प्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली.

शासनाच्या लोककल्याणकारी योजना व व्यक्तिगत लाभाच्या योजनांचा लाभ गरजू नागरिकांना मिळावा यासाठी राज्य शासनाच्यावतीने राज्यभर “शासन आपल्या दारी” या महत्वाकांक्षी कार्यक्रमाचे आयोजन जिल्हानिहाय सुरू आहे. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून तालुकास्तरीय “शासन आपल्या दारी” हा उपक्रम घेण्याचे नियोजन केले आहे. जळगाव जिल्ह्यातील पहिला तालुकास्तरीय “शासन आपल्या दारी” हा उपक्रम पाचोरा येथे होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री गुलाबराव पाटील, ना. गिरीश महाजन, ना. अनिल पाटील यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री यांची उपास्थिती लाभणार आहे.

यावेळी पाचोरा व भडगाव तालुक्यातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी अनेक वर्षे प्रयत्न सुरू असलेल्या औद्योगिक वसाहत, पाचोरा येथील उपजिल्हा रुग्णालय, क्रीडा संकुल यासह विविध विकास कामांचे भूमीपूजन व उद्घाटन केले जाणार आहेत. शिवाय पाचोरा व भडगाव तालुक्यातील सुमारे पंधरा हजार लाभार्थ्यांना विविध शासनाच्या योजनांचा लाभ देण्याचे नियोजन प्रशासन स्तरावर केले आहे. याबाबत आ. किशोर पाटील व उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन नियोजन केले आहे.

दौरा पुढे ढकलला

मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या कार्यव्यस्ततेमुळे शनिवारी, २६ ऑगस्ट रोजी होणारा दौरा पुढे ढकलला आहे. सप्टेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात हा दौरा होऊ शकतो. सुधारित तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे आ. किशोर पाटील यांनीही सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here