मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यरात्रीच्या सुमारास दिल्लीत दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. शिंदे हे एकटेच दिल्लीला गेले आहेत. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्यासोबत नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुढचे पाऊल नेमके काय असणार याची सर्वांना प्रतीक्षा आहे. खासदारांसोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी शिवसेना खासदारांच्या बंडाबाबत आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. आमदारांना फोडल्यानंतर आता ते खासदारांना आपल्या गटात सामील करण्याच्या तयारीत आहेत. सुप्रीम कोर्टात(SC) बुधवारी होणाऱ्या सत्ता संघर्षावरील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचा हा दौरा असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेच्या आमदारांनंतर आता खासदारसुद्धा बंड करण्याच्या तयारीत आहेत.
आमच्याकडे १२ नव्हे ; तर १८ खासदार असल्याचा, गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी उघड केला आहे. लोकसभेत शिवसेनेचे एकूण १८ खासदार आहेत. हे सर्व खासदार लवकरच शिंदे गटात येणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. त्यातील सहा ठाकरे यांच्यासोबत राहण्याच्या मनस्थितीत आहेत. सहा खासदारांपैकी काही खासदार शिंदे गटात आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा प्रयत्न आहे का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणावर होणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये आले असल्याचे शिंदेंनी सांगितले. राज्यातील ओबीसींना न्याय देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. राज्याच्या दृष्टीनेही ओबीसी आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा असल्याने तज्ज्ञ वकिलांशी चर्चा करणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. लोकशाहीत बहुमताला महत्व असून आमच्याकडे बहुमत आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट आमच्या बाजूने निकाल देईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. दिल्लीत ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी वकिलांची भेट घेणार असल्याचेदेखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
राष्ट्रपतिपदाच्या मतदान प्रक्रियेनंतर शिंदे गटाच्या ऑनलाईन बैठकीला शिवसेनेच्या १८ पैकी १२ खासदार उपस्थित होते. अर्धा तास बैठक झाल्यानंतर शिंदे गटाच्या गटनेते पदी राहुल शेवाळे आणि मुख्य प्रतोदपदासाठी भावना गवळी यांचे नाव समोर आले आहे. शिंदे गट आता नवीन गट स्थापन करण्याच्या तयारी आहे. त्यासाठी चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झाल्याचे बोलले जात आहेे.