साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
चाळीसगाव शहरातील घरफोडी चोरीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) यश आले आहे. या कारवाईत संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून चोरीच्या रकमेपैकी ४० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
३१ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत चाळीसगाव शहरातील एका बंद घराच्या मागील भिंतीच्या पत्र्यातून चोरट्याने आत प्रवेश केला. घरातील स्टीलच्या डब्यात ठेवलेली ८० हजार रुपयांची रोकड लांबवून चोरटा पसार झाला होता. याप्रकरणी ३ ऑगस्ट रोजी दिलेल्या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात ‘भारतीय न्याय संहिता’ कलम ३०५ व ३३१(३) अन्वये गुन्हा (रजि. क्र. ३६८/२०२६) दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना तत्काळ गुन्हा उघडकीस आणण्याचे निर्देश दिले. त्यानुसार गुन्हे शाखेचे विशेष पथक तयार करण्यात आले.
तपासादरम्यान गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, संशयित नदीमशहा लियाकतशहा हा घाट रोड, विष्णू पार्क परिसरात वावरत आहे. या माहितीच्या आधारे पथकाने परिसरात सापळा रचून नदीमशहा याला ताब्यात घेतले.
पंचासमक्ष घेतलेल्या अंगझडतीत आरोपीकडे ४० हजार रुपये रोख आढळून आले. कसून चौकशी केली असता, ही रक्कम चाळीसगाव येथील घरफोडीतीलच असल्याचे त्याने मान्य केले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपी व जप्त रोकड चाळीसगाव शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील, पोलीस कॉन्स्टेबल महेश पाटील, सागर पाटील व भूषण शेलार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
