साईमत -जळगाव -प्रतिनिधी | जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी आज जळगाव तालुक्यातील कंडारी ग्रामपंचायतीला अचानक भेट देत प्रशासकीय यंत्रणेची चांगलीच झाडाझडती घेतली. शाळा, अंगणवाडी आणि ग्रामपंचायत कार्यालयातील सोयी-सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करत त्यांनी कामकाजाचा लेखाजोखा घेतला. नागरिकांना महाऑनलाईनच्या सेवा वेळेत न मिळाल्यास किंवा शासकीय दप्तरामध्ये त्रुटी आढळल्यास गय केली जाणार नाही, असा थेट इशाराच ‘सीईओ’ नायर यांनी दिला.
या दौऱ्याची सुरुवात मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांच्या हस्ते ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपण करून झाली. केवळ औपचारिकता म्हणून झाडे लावू नका, तर त्याचे जिवंत संगोपन करा, असा सल्ला त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिला.
पोषण आहाराच्या गुणवत्तेत तडजोड नको; अंगणवाडीत ‘ऑन द स्पॉट’ तपासणी
कंडारी येथील अंगणवाडी केंद्रात पोहोचताच सीईओ नायर यांनी थेट बालकांच्या पूरक पोषण आहाराचे रजिस्टर ताब्यात घेतले. आहार नियमित मिळतो का, त्याची गुणवत्ता कशी आहे, याची त्यांनी ‘ऑन द स्पॉट’ खात्री केली. बालकांच्या आरोग्य व पोषणविषयक नोंदी अद्ययावत ठेवण्याचे निर्देश देत, यात कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि स्वच्छ, सुरक्षित वातावरण देण्याच्या सूचना शिक्षकांना दिल्या.
ग्रामपंचायत कार्यालयात चालणाऱ्या महाऑनलाईन सेवांचा आढावा घेताना नागरिकांना दाखल्यांसाठी चकरा माराव्या लागतात का, याची त्यांनी विचारणा केली. “नागरिकांना वेळेत, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने दाखले मिळालेच पाहिजेत,” असे निर्देश त्यांनी कर्मचाऱ्यांना दिले. यावेळी त्यांनी स्वतः गाव नमुना क्रमांक ८ आणि ९ या महत्त्वपूर्ण नोंदींची व शासकीय अभिलेखांची बारकाईने तपासणी केली. सर्व रेकॉर्ड अचूक आणि ‘अप-टू-डेट’ ठेवण्याचे कडक आदेश त्यांनी दिले.
या महत्त्वपूर्ण दौऱ्यादरम्यान जिल्हा परिषदेचे संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी, कंडारी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
