साईमत, जामनेर : प्रतिनिधी
भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठीच होळी महोत्सव दरवर्षी साजरा करण्यात येणार आहे. युवा पिढीने व्यसनापासून दूर रहावे, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून मोठे अधिकारी बनावे आणि देशाची सेवा करावी. माता-भगिनींनी आपल्या संस्कारातून पुढील पिढीला घडवावी. त्यामुळे सद्गुरु ब्रह्मलीन प.पू. लक्ष्मण चैतन्य बापू यांचे वचन आपल्या आचरणात येईल. यासोबत मनातील वाईट दुर्गुणांची होळी करुन दरवर्षी आनंदाने होळी साजरी करा, असे प्रतिपादन चैतन्यधाम येथील गुरुदेव सेवाश्रमाचेे गादीपती प.पू.शाम चैतन्य महाराज यांनी केले.
चैतन्यधाम येथील गुरुदेव सेवाश्रम येथे होळी नृत्य महोत्सवाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. महोत्सवात छत्रपती संभाजी नगर, बुलढाणा व जळगाव जिल्ह्यातील बंधू-भगिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला होता. यामध्ये हजारो स्त्री-पुरुष यांनी मोठ्या आनंदाने होळी नृत्य महोत्सवाचा आनंद लुटला.
याप्रसंगी आरोग्यदूत रामेश्वर नाईक यांना ‘खान्देश भूषण पुरस्कार’ तसेच उद्यान पंडित रवींद्र माधवराव महाजन यांना महाराष्ट्र शासनाचा ‘वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार’ मिळाल्याबद्दल गुरुदेव सेवाश्रम ट्रस्टच्यावतीने श्याम चैतन्य महाराज यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला.
गुरुदेव सेवाश्रम चैतन्य धामच्या निसर्गरम्य वातावरणात महोत्सवासाठी स्त्री व पुरुषांनी आपापल्या होळीकोत्सव नृत्य प्रकारात भारतीय संस्कृतीला धरून असलेला पेहराव, आभूषण, साज शृंगार करून जामनेर परिसरात प्रथमच झालेल्या होळी नृत्य महोत्सवात तिन्ही जिल्ह्यातून सुमारे ३५ संघांनी सहभाग घेतला. कार्यक्रम संपल्यानंतर बक्षीस वितरण करण्यात आले. प्रथम क्रमांक आलेल्या संघाला ३१०० रुपये, द्वितीय संघाला २१०० रुपये आणि उर्वरित सर्व संघांना अकराशे रुपये प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. याप्रसंगी उपस्थित सर्वांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. यावेळी समाजातील ज्येष्ठ, श्रेष्ठ, युवा, माता-भगिनी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.