करण पवार यांच्या उमेदवारीने जळगाव लोकसभा मतदार संघातील राजकीय गणित बदलणार

0
1
करण पवार यांच्या उमेदवारीने जळगाव लोकसभा मतदार संघातील राजकीय गणित बदलणार-saimat

साईमत पारोळा प्रतिनिधी

जळगाव लोकसभा मतदार संघातून शिवसेना ठाकरे गटाने काल पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांना उमेदवारी जाहीर केले असून त्याबरोबरच जळगाव लोकसभेचे समीकरण झपाट्याने बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.भाजपाने यावेळी विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी डावलून माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी संधी दिली असली त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागल्याने त्यांची उमेदवारी पुन्हा रद्द होते की काय,अशीही चर्चा रंगू लागली.आता करण पवार यांची प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून उध्दव ठाकरे यांनी घोषणा करताच,स्मिता वाघ यांची उमेदवारी कायम राहिल्यास या मतदार संघात भाजपाला धक्का बसू शकतो,असा अंदाज बांधला जाऊ लागला आहे त्यामुळे स्मिता वाघ यांच्याऐवजी करण पवार यांना कडवी झुंज देऊ शकेल असा उमेदवार द्यावा अशी मागणी पुढे येऊ लागली आहे.

जळगाव लोकसभा निवडणुकीसाठी सत्तारुढ भाजपाच्या इच्छुकांमध्ये विद्यमान खासदार उन्मेश पाटील,माजी खासदार ए.टी.नाना पाटील,माजी आमदार स्मिता वाघ यांची नावे आघाडीवर होती.त्यात स्मिता वाघ यांना उमेदवारी घोषित करण्यात आल्याने खा.उन्मेष पाटील यांनी व त्यांच्या समर्थकांनी नाराजीचा सूर लावला.अखेर उन्मेष पाटील यांनी खासदारकीचा राजिनामा देत काल करण पवार व शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश केला.

त्यात माजी आमदार स्व.भास्करअप्पा पाटील यांचे नातू तसेच माजी मंत्री सतिषअण्णा पाटील यांचे पुतणे, पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांना जळगावमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली.हे वृत्त जिल्ह्यात येऊन धडकताच भाजापाच्या गोटाला धक्का बसला असून स्मिता वाघ यांच्या विजयाच्या मार्गात स्वकियांनेच अडथळा उभा केल्याने उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.प्रारंभीच्या टप्प्यात स्मिता वाघ यांचा सुकर वाटणारा विजय आता तितका सोपा नाही अशी प्रतिक्रिया मतदारांमध्ये उमटू लागली असून भाजपा पक्षश्रेष्टींनी जळगाव मतदार संघातील बदलत्या राजकीय परिस्थितीचा गांभीर्याने विचार करुन स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द करुन माजी खासदार ए.टी.नाना पाटील यांना संधी दिल्यास जळगाव लोकसभा मतदार संघातील लढत रंगतदार होऊन विजयश्री खेचून आणण्यातही ते यशस्वी होऊ शकतील,असा विश्वास त्यांचे समर्थक व्यक्त करीत आहेत.

ए.टी.नाना हे जळगावमधून दोन वेळा खासदार म्हणून प्रचंड मतांनी विजयी झाले असून जळगाव लोकसभा मतदार संघातील सर्व तालुक्यातील जनतेने त्यांना साथ दिली आहे.त्यांनी समाजकारणाबरोबरच राजकारणातही आपल्या व्यक्तीमत्वाचा ठसा उमटवला आहे.ते पारोळा येथील रहिवाशी असून त्यांचा सर्व क्षेत्रात दबदबा आहे.करण पवार हेदेखील पारोळ्याचे असून ए.टी.नानांना भाजपाने संधी दिल्यास तोडीस तोड लढत रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

स्मिता वाघ ह्या गेल्या निवडणूकीच्या वेळीही उमेदवारी स्पर्धेत होत्या.एवढेच नाहीतर त्यांची उमेदवारीही पक्षाने जाहीर केली होती मात्र नंतर ऐनवेळी त्यांची उमेदवारी रद्द करुन चाळीसगावचे उन्मेष पाटील यांना संधी देण्यात आली व त्यांनी तब्बल साडे चार लाख मताधिक्याने विजय प्राप्त करुन,पाच वर्षात विकास कामेही केली.तरीही त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने ते नाराज झाले व त्यांनी खासदारकीचा राजीनामा देत शिवसेना (उबाठा)पक्षात प्रवेश करुन करण पवार यांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.करण पवार हे एक युवा नेतृत्व असून अल्पावधीत त्यांनी जनमानसात आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवली आहे.त्यांचे आजोबा माजी आमदार भास्करअप्पा पाटील यांचे पारोळा तालुक्यावर अनेक वर्चस्व राहिले आहे त्यानंतर त्यांचे काका डॉ.सतिषअण्णा पाटील यांनीही आमदारकीसह मंत्रीपदही भूषवले आहे.

या परिवाराचा पारोळा तालुक्यातील नेहमीच पगडा राहिला आहे त्यामुळे करण पवार यांना तुल्यबळ लढत देण्यात स्मिता वाघ या काही प्रमाणात कमी पडू शकतात त्यामुळे जळगाव लोकसभा निवडणुकीत करण पवार यांना कटशाह देऊ शकणारे माजी खासदार ए.टी.नाना पाटील यांना भाजपाने उमेदवारी द्यावी अशी मागणी होऊ लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here