मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियानामुळे पाळधी पॅटर्न राज्यात आदर्श ठरणार

0
2

साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर

आपल्या परिसरातील गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान हा पाळधी पँटर्न राज्यभरात आदर्श ठरेल, असा विश्‍वास धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती मुकूंदराव नन्नवरे यांनी व्यक्त केला. शिवसेना (शिंदे गट) मागासवर्गीय सेनेचे जिल्हाप्रमुख मुकुंदराव नन्नवरे, जीपीएस परिवार, गुलाबराव पाटील फाउंडेशन, मुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंद गोसावी यांच्या माध्यमातून धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे भव्य नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराचे विशेष आयोजन केले होते. त्यानंतर जळगाव येथे पात्र रुग्णांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्याप्रसंगी ते बोलत होते.

मागील आठवड्यात पाळधी येथे झालेल्या भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरातील पहिल्या टप्प्यात आज अर्धशतक मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना शस्त्रक्रिया झाल्यानंतर काळे चष्मे, औषधी ड्रॉप, मिठाई देऊन जळगावहून पाळधी येथे घरपोच सोडून निरोप देण्यात आला. जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी उपक्रमाला शुभेच्छारुपी पाठबळ देऊन आमचा उत्साह द्विगुणित केला.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांना चार वर्षातून येणाऱ्या २९ फेब्रुवारी जन्मदिवसाच्या यावेळी पुष्पगुच्छ देऊन आणि केक कापून रुग्णांसमवेत शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी रुग्णांच्या चेहऱ्यावर अतिशय समाधान आणि आनंद दिसत होता. आपल्या परिवारापेक्षाही अधिक तन्मयतेने सेवा केल्याने आयोजकांचे तसेच कर्तव्यदक्ष पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांचे सर्व रुग्णांनी कौतुक करून भरभरून आशीर्वाद दिले.
याकामी डॉ. प्रवीण पाटील, डॉ. शिल्पा पाटील, डॉ.निशा गाढे, डॉ. सुनिता वक्ते, डॉ. पूजा इंगळे, डॉ. नितेश सोनार, डॉ. जी.आर.विवेक, डॉ. दिव्या, संदीप पाटील, दर्शन लोखंडे, चेतन निकम, बापू शिरनामे, शेखर वैद्य यांच्यासह नेत्र विभागाचे सहकार्य लाभले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here