साईमत, जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील पहूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शेरी शिवारातील शेरी-लोंढरी दरम्यानच्या पाझर तलावात शेरी आणि पहूर येथील शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिकल मोटारच्या केबल चोरट्यांनी लांबविल्या आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांच्या सलग तिसऱ्यांदा इलेक्ट्रीक केबलच्या चोऱ्या आहेत. यासंदर्भात शेतकऱ्यांनी पहूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली नाही. गेल्या वेळेस तक्रार दाखल करूनही काही एक फायदा होत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळेच यावेळी तक्रार दाखल केली नसल्याचेही शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे चोरट्यांचा कडक बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
सविस्तर असे की, शेरी आणि पहूर भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी इलेक्ट्रिक मोटारी शेरी येथील धरणावर (पाझर तलाव) बसविलेल्या आहेत. उन्हाळा सुरू झाल्याने पिकांना मुबलक प्रमाणात पाणी देणे आवश्यक असतांना अज्ञात चोरट्यांनी २० ते २५ शेतकऱ्यांच्या तांब्याच्या केबल चोरून नेल्या आहेत. यावरुन चोरट्यांची हिम्मत वाढल्याचे परिसरात दिसून येत आहे. चोरट्यांनी या भागात तिसऱ्यांदा केबल चोरी केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पुन्हा नवीन केबल खरेदी कराव्या लागत असल्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहे.
पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी केबल चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेरी येथील रवींद्र पाटील, संजय बनकर, भारत सटाले, डिगंबर सटाले, समाधान तायडे, नथू पाटील, भगवान पाटील, संजय पाटील, शंकर काकडे, दादाराव सोनवणे, देवीदास पांढरे, एकनाथ पांढरे यांच्यासह पहूर येथील शेतकऱ्यांनी केली आहे.