गांधी विचार संस्कार परीक्षेद्वारे मोठ्या भाऊंनी पुढच्या पिढीला मूल्ये, विचार व तत्त्वे दिलीत : गायकवाड

0
3

साईमत जळगाव प्रतिनिधी

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या गांधी विचार संस्कार परीक्षेद्वारे मोठ्या भाऊंनी पुढच्या पिढीला मूल्ये, विचार व तत्त्वे दिलीत. हाच वारसा घेऊन संस्था वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन माजी शिक्षणाधिकारी नीलकंठ गायकवाड यांनी केले. गांधी विचार संस्कार परीक्षेच्या जळगाव जिल्हास्तरीय पारितोषिक वितरणप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ मुंबईचे अध्यक्ष जे. के. पाटील, गांधी रिसर्च फाउण्डेशनच्या सौ. अंबिका जैन, डॉ. गीता धर्मपाल, डॉ. अश्विन झाला, वरिष्ठ गांधीयन अब्दुलभाई व परीक्षा नियंत्रक गिरीश कुळकर्णी उपस्थित होते.

आपल्या मनोगतात दक्षिण आफ्रिकेतील सैनिक अधिकारी जनरल स्मट्स याला अहिंसा मार्गाने गांधीजींनी कसे जिंकले, गांधीजींनी स्वतः तयार करुन दिलेल्या चप्पलेची त्यांनी आयुष्यभर पूजा केली यासंदर्भातील गोष्ट सांगितली. गांधीजींच्या सत्याग्रह व कायदेभंग चळवळीला समाजाने पाठबळ दिल्याचेही ते म्हणाले. साधी सरळ राहणी, कमीत कमी गरजा, कणखरपणा, सामर्थ्याने व निग्रहाने गांधीजींनी माणसे जोडली. त्यासाठी चरखा सारख्या श्रम मूल्य रुजविणाऱ्या साधनाचा त्यांनी वापर केला असेही गायकवाड म्हणाले. गांधी विचार संस्कार परीक्षेस जळगांव जिल्ह्यातील प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग द्यावा असे आवाहन ही त्यांनी या प्रसंगी केले.
महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. आपल्या मनोगतात प्रा. डॉ. अश्विन झाला यांनी मूल्य शिक्षणाद्वारे चारित्र्य निर्मितीचे कार्य गांधी विचार संस्कार परीक्षा करीत असल्याचे सांगितले. मानवतेचा संस्कार देणाऱ्या या परीक्षेच्या आयोजनात समन्वयकांची भूमिका महत्त्वाची आहे. प्रमुख पाहुणे म्हणून मनोगत व्यक्त करतांना सध्याच्या धकाधकीच्या व स्पर्धेच्या युगात प्रगती करतांना शिक्षण व आर्थिक स्तर वाढला मात्र त्याच वेळेस वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे हि चिंतेची बाब आहे असे जे. के. पाटील म्हणाले. त्यामुळे गांधीजींनी म्हटल्याप्रमाणे खरी संस्कृती व परंपरा असलेल्या ग्रामीण संस्कृतीचा आपण अंगीकार केला पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वजित पाटील यांनी तर आभार प्रदर्शन गिरीश कुळकर्णी यांनी केले. कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यातील १२९ शाळा व महाविद्यालयांमधील इ. ५वी ते पदव्युत्तर वर्षांच्या २०६ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदके व प्रमाणपत्र वितरित करण्यात आली. यात ४५ विद्यार्थ्यांना सुवर्ण, ६८ विद्यार्थ्यांना रौप्य तर ९३ विद्यार्थ्यांना कास्य पदकांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे सूत्र संचालन चंद्रशेखर पाटील यांनी केले. कार्यक्रमास गुणवंत विद्यार्थ्यांसह शिक्षक व पालक मोठया संख्येने उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here