साईमत न्यूज नेटवर्क –
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. मुंबईतील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह डोंगराळ व निर्जन भागात फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी माणगाव पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपीला अटक करत तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
माणगाव तालुक्यातील घरोशीवाडी परिसरातील डोंगर भागात एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिसांसह फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. प्राथमिक तपासात मुलीच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे तसेच गळा आवळून तिची हत्या केल्याचे स्पष्ट झाले.
निधी उतेकर असे मृत मुलीचे नाव असून ती मुंबईतील विलेपार्ले परिसरातील रहिवासी होती. नुकतीच नववीची परीक्षा उत्तीर्ण झालेली निधी काही दिवसांपूर्वी आई-वडील व भावासोबत मूळ गावी आली होती. दरम्यान, सोमवारी संध्याकाळी ती कुणाशीतरी मोबाईलवर बोलताना शेवटची दिसली होती. त्यानंतर ती बेपत्ता झाली होती.
या प्रकरणात शुभम उतेकर (वय ३४) याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी विवाहित असून तोदेखील काही दिवसांपूर्वी गावी आला होता. पोलिसांच्या तपासात निधी आणि शुभम यांच्यात संपर्क असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर संशयाच्या आधारे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत चौकशी केली असता गुन्ह्याची उकल झाली.
शवविच्छेदन अहवालात मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे कोणतेही पुरावे आढळले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी निधीच्या कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. माणगाव पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
