प्रशांत चौधरी, धानोरा, ता. चोपडा :
‘कानबाई चालनी गंगेवरी माय चालनी गंगेवरी, तुले काय लागावं व्हंत माय सांगी दे तु माले…!’
संपूर्ण खान्देशात सुपरिचीत असलेला कानबाई, रानबाई उत्सवास रविवारपासून सुरुवात होत आहे. रोटांचा सण म्हणून हा कानबाई उत्सव मोठ्या उत्सवात ग्रामीण भागात साजरा करण्यात येतो. कानबाई मातेच्या स्थापनेच्या एक दिवस अगोदर ‘सपत्या ‘ हा सण साजरा करतात. हा सण श्रावण महिन्यात प्रत्येकवर्षी शनिवारीच येतो. दुसऱ्या दिवशी कानबाईचे रोट असतात.
अशी होते कानबाईची स्थापना
श्रावण महिन्यातील येणाऱ्या पहिल्या रविवारी कानबाईची स्थापना आपल्या खान्देशात मोठ्या उत्साहात करतात. प्रत्येक कुटूंबात आपआपल्या मानानुसार कानबाई मातेचे स्वरुप तयार करतात. त्यात तांब्याची कानबाई, नारळाची कानबाई व हातापायांची कानबाई असे तीन प्रकार पडतात. रविवारी सकाळी ८ वाजता स्थापना झाल्यावर कानबाईला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो तर गोरज महुर्तावर आरती करण्यात येते. मोठ्या उत्साहात भाऊबंदकीतील सर्व सदस्य एकोप्याने याठिकाणी एकत्र जमतात. रात्री पुरणपोळीचा प्रसाद सेवन करतात. रात्री सर्वजण एकाच ठिकाणी येऊन भजनी मंडळासोबत वह्या, भारुडे, भजने, कानबाईची विविध गाणे गायन करतात. त्याचबरोबर ‘कानबाई-कानबाई झारला कडीचा फुरका मारला, उची निची खिडकी तिरपा पाय कन्हेर नीघरनी कानबाई माय ‘ या गितातून कानबाईचा भाव व्यक्त होतो. ‘लाल, लाल लुगडंनी माय तू हिरवा पदरंनी ‘कसां करु शिंगार हया कानबाई ना मायरानु बाईना!, ‘कानबाई चालनी गंगेवरी साखर पेरत चालनी’, कानबाई बैसली चौरंगवरी, यासह विविध प्रकारच्या गाण्याच्या बोलावर महिला मंडळ आणी पुरुष मंडळी ताल धरतात. अश्ाा पध्दतीने रात्रभर जागरण करुन मोठ्या प्रमाणात आकर्षण पध्दतीने उत्सवाचा आनंद सर्व परिवारातील सदस्य घेतात. सुरत, उधना, मुंबई, पुणे, जळगाव, औरंगाबाद, वाशी, पनवेल, जालना, अहमदनगर आदी महत्त्वाच्या शहरात विविध पदावर कार्यरत असलेल्या भाऊबंदकीचे लोक या सणाला आपल्या गावाकडे येत असतात आणि आर्वजुन सांगतात की, आमचा पूर्ण परिवार कानबाईच्या रोटांसाठी आले आहोत, तर दुसऱ्या दिवशी सोमवारी १० वाजता वाजत – गाजत भव्य अशी मिरवणूक संपूर्ण गावातून काढण्यात येते तर यावेळी कानबाईला डोक्यावर घेत भाविक-भक्त नाचत असतात गाणी म्हणतात. अश्ाा रितीने मोठ्या उत्साहात गाव विहिरीजवळ कानबाई मातेचे विसर्जन करण्यात येते तर मंगळवारी आणि बुधवारी कानबाईचे रोट वाढविले जातात. बुधवारी त्याच रोटांना पुजल्यावर संपूर्ण भाऊबंदकी त्याचा प्रसाद म्हणून आस्वाद घेतात. संपूर्ण खान्देशात प्राचीन पुरातन काळापासून कानबाईचा रोटाचा उत्सव साजरा करण्यात येतो. लहान मुले कमरेला घुंगरांची माळ बांधुन नाचत गायन करत सहभाग घेतात. यात महिला मंडळ, पुरुष मंडळी, ग्रामस्थ, भजनी मंडळे सहभागी होतात.
कानबाईला बळीराजासह सर्वांचे साकडे
यानिमित्त का होईना संपूर्ण घराची स्वच्छता होत असते. झोपण्यासाठी वापरात असलेल्या गोधड्या, झावरी, चादरी, स्वच्छ धुतल्या जातात. कानबाई उत्सवात महिला वर्ग झिम्मा फुगडी खेळून गाणी गाऊन आपला आनंद व्यक्त करतात. धानोऱ्यात ५ ते ६ ठिकाणी कानबाई माताची स्थापना करण्यात येते. महिला पुरुष मंडळगावातील कानबाई माता स्थापनास्थळी जावून दर्शन आणि प्रसादाचा लाभ घेतात. घरोघरी पुरणपोळीचे जेवण तयार करण्यात येते. काही ठिकाणी पुरणपोळी, खीर तर बहुतेक घरी भाजी, भाकरी त्यात किल्लुची भाजी, कळण्याच्या भाकरीचे पूजन करण्याची परपंरा अस्तिवात आहे. रविवारी, २७ रोजी कानबाईची खान्देशात स्थापना करण्यात येणार आहे. यंदा मात्र शेतीकामाचा व्याप पाहता भाऊबंदकी एकत्र जमण्यास अडचण होणार नाही आणि गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण खान्देशात पावसाने चांगली साथ दिल्याने खान्देशात भरपुर पाऊस पडु दे आणि विविध आजाराजे संकट टळू दे, असे साकडे बळीराजासह सर्वंच कानबाईला घालतात.