ब्राह्मणशेवगे-हिरापूर रस्ता डांबरीकरणाच्या प्रतिक्षेत

0
2

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील ब्राह्मणशेवगे ते हिरापूर रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली होती. नागरिकांच्या सततच्या मागणीनंतर हा रस्ता मंजूर झाला आहे. काही दिवसांपूर्वी साईडपट्ट्या तयार करण्यात आल्या आहे. तसेच खडी टाकण्यात येत आहे. परिसरातील पाण्याची स्थिती बिकट असल्याने रस्त्याच्या कामासाठी पाणी नसल्याने रस्त्याचे काम रखडले आहे. दरम्यान, खराब रस्ता, अरुंद रेल्वे पुलामुळे रस्त्यावरील बस वाहतूक बंद केली आहे.

तालुक्यातील ब्राह्मणशेवगे, नाईकनगर, माळशेवगे, शेवरी येथील नागरिकांना रस्ता खुपच खराब झाल्याने तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे डोणदिगरमार्गे शहराच्या ठिकाणी ये-जा करावी लागते. रस्त्यावर पडलेल्या खड्यांमुळे व हिरापूर येथील रेल्वे पुलामुळे पूर्वीपार या मार्गाने ये-जा करणारी बस वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. हिरापूर रेल्वे स्टेशनवर पॅसेंजर थांबत असल्याने या ठिकाणाहून अनेक प्रवासी हिरापूर येथे येत-जात असतात. बस वाहतूक पूर्णपणे बंद होऊन प्रवाशांची गैरसोय होत आहे.

सध्या ह्या मार्गावरील बस वाहतूक बिलाखेड, डोणपिंप्रीमार्गे वळविण्यात आली आहे. त्यामुळे हिरापूर मार्गावरील प्रवाशांचे हाल होत आहेत. हिरापूर- ब्राह्मणशेवगे रस्त्याचे डांबरीकरण व्हावे, यासाठी अनेकवेळा ग्रामपंचायतीतर्फे व सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ माळी यांनी वेळोवेळी निवेदनाद्वारे मागणी करत पाठपुरावा केला आहे. या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून रस्ता मंजुरी होऊन अनेक दिवस झाले आहे. रस्ता डांबरीकरणाचे काम पाण्याअभावी अतिशय संथगतीने सुरु आहे. पावसाळ्यापूर्वी रस्ता झाला पाहिजे व या रस्त्यावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल थांबवावेत, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ माळी यांच्यासह प्रवाशांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here