सकाळी शेतात गेल्यावर विहिरीत तरंगताना सापडला अज्ञात महिलेचा मृतदेह पोलिसांचा तपास सुरू
साईमत /जळगाव / प्रतिनिधी
शिरसोली ते पाचोरा मार्गावरील शिरसोली गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतातील विहिरीत एका अज्ञात वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आल्याने मंगळवारी सकाळी परिसरात एकच खळबळ उडाली. मृत महिलेचे वय अंदाजे ६० ते ६२ वर्षे असून तिची ओळख अद्याप पटलेली नाही. ही घटना आत्महत्येची आहे की घातपाताचा प्रकार, याचा उलगडा करण्यासाठी एमआयडीसी पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरसोली-पाचोरा रस्त्यालगत असलेल्या मिठाराम आनंदा पाटील यांच्या शेतातील विहिरीत मंगळवारी सकाळी सुमारे आठ वाजेच्या सुमारास मृतदेह तरंगताना दिसून आला. शेतमालक मिठाराम पाटील हे नेहमीप्रमाणे शेतात आल्यानंतर त्यांना विहिरीत वृद्ध महिला मृतावस्थेत असल्याचे आढळले. त्यांनी तत्काळ शिरसोलीचे पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांना याबाबत माहिती दिली.
माहिती मिळताच पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आणि एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची माहिती गावात पसरताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विहिरीतून बाहेर काढला असून शवविच्छेदनासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. प्राथमिक तपासात मृत महिलेची ओळख पटलेली नसून तिच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, सदर मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा प्रकार आत्महत्येचा आहे की घातपाताचा, याबाबत शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांच्या पुढील तपासानंतरच सत्य समोर येणार आहे. अज्ञात वृद्ध महिलेबाबत कोणाला कोणतीही माहिती असल्यास त्यांनी तातडीने एमआयडीसी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
