फिल्मी स्टाईल घटना ‘थार’ ने महसूल पथक रोखून डंपर फरार
साईमत /शिरसोली / प्रतिनिधी
जळगाव तालुक्यातील शिरसोली परिसरात अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकाला वाळू माफियांनी थेट आव्हान दिल्याची गंभीर घटना समोर आली आहे. शासकीय वाहनासमोर ‘थार’ आडवी लावून महसूल पथकाला रोखत अवैध वाळूने भरलेला डंपर पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
ही घटना २७ जून रोजी रात्री सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास शिरसोली प्र. न. येथील इंदिरानगर परिसरात घडली. नायब तहसीलदार राहुल नगराज वाघ (वय ३९, रा. अल्पबचत भवन परिसर, जळगाव) हे आपल्या पथकासह अवैध वाळू वाहतुकीविरोधात पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक विना क्रमांकाचा टाटा कंपनीचा डंपर संशयास्पदरीत्या वाळू वाहतूक करताना आढळून आला.
महसूल पथकाने तत्काळ कारवाई सुरू करण्याचा प्रयत्न केला असता काही क्षणांतच परिस्थिती तणावपूर्ण बनली. काळ्या रंगाची ‘थार’ (क्रमांक MH-19 EG-9171) घटनास्थळी आली आणि शासकीय वाहनासमोर जाणीवपूर्वक आडवी लावण्यात आली. या अडथळ्यामुळे महसूल पथकाची कारवाई काही काळ ठप्प झाली.
याच संधीचा फायदा घेत डंपर चालकाने अवैध वाळूसह वाहन घटनास्थळावरून पळवले. प्राथमिक तपासणीत या डंपरमध्ये सुमारे ५ ब्रास वाळू असल्याचे निष्पन्न झाले असून, त्याची अंदाजे बाजारमूल्य किंमत २१ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी नायब तहसीलदार राहुल वाघ यांच्या फिर्यादीवरून विना क्रमांकाचा डंपर चालक तसेच ‘थार’ वाहन चालक अशा दोन अज्ञातांविरुद्ध जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) व २२२ अन्वये हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या घटनेनंतर महसूल विभागात तीव्र संतापाचे वातावरण असून अवैध वाळू माफियांवर कठोर कारवाई करण्याची मागणी अधिक तीव्र झाली आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चेतन पाटील करत आहेत.
