
नागपूर : वृत्तसंस्था
विरोधी पक्ष नेत्यांनी ते कधीच भाजपामध्ये येणार नाही, एवढे जाहीर करावे, ही कोणाची निवडणूक पहिली आणि कोणाची शेवटची, हे लोकांच्या लक्षात येईल, असे आव्हान वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना दिले.
नागपुरातील मेडिकल रुग्णालयात शनिवारी नेत्रदान पंधरवड्याच्या कार्यक्रमानिमित्त आले असता येथे मुनगुंटीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. विजय वडेट्टीवारांनी भाजपाची ही शेवटची निवडणूक असल्याचे भाष्य केले होते.त्यावर मुनगंटीवार म्हणाले की, भाजपाबद्दल विधान करण्यात अर्थ नाही. या विधानातून ते काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु हा त्यांचा गैरसमज आहे. राजकीय पक्षाचा इतिहास शिकवायचा असेल तर त्याच्यामध्ये काँग्रेस, समाजवादी आणि भाजपा सर्व राजकीय पक्षांचा इतिहास शिकवला जाईल. विरोधी पक्ष नेत्यांच्या जुन्या भाषणांची क्लिप काढून ऐकवली आणि त्यांचे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या संदर्भातले जुने मत काय हे सांगितले तर बरे होईल. ते नेहमी भूमिका बदलतात, त्यामुळे भूमिका बदलून ते लोकांना आपल्या बाजूने करू शकत नसल्याचेही मुनगंटीवार म्हणाले. शरद पवार संभ्रम निर्माण करतील. त्यांच्याकडे वेळ आहे. देशासमोर असलेले प्रश्न आणि देशासमोरच्या समस्या या संदर्भात भाष्य करण्याऐवजी सध्या त्यांची जी पारंपरिक राजकीय भाषणबाजी सुरू आहे त्याकडे दुर्लक्ष करणे हेच उत्तम असल्याचेही मुनगंटीवार म्हणाले.


