“नितीन गडकरींना राजकारणातून संपवण्यासाठी भाजपाने….”, काँग्रेस नेत्यांचा खळबळजनक आरोप

0
3

मुंबई :

कॅगच्या अहवालात मोदी सरकारच्या सात योजनांमधील भ्रष्टाचारावरून ताशेरे ओढण्यात आले. यानंतर विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी कॅगच्या अहवालातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा काटा काढण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. ते शुक्रवारी (१८ ऑगस्ट) मुंबईत शरद पवारांची भेट घेतल्यानंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

विजय वडेट्टीवार म्हणाले, “कॅगचा रिपोर्ट दोन गोष्टींसाठी महत्त्वाचा आहे. एक म्हणजे भाजपाच्या अंतर्गत राजकारणाचा भाग म्हणून नितीन गडकरींचा काटा काढण्यासाठी कॅगच्या रिपोर्टचा वापर होत आहे. प्रत्येक विभागात प्रचंड भ्रष्टाचार होत असताना कॅगने केवळ गडकरींवर ताशेरे ओढले. यातून हे स्पष्ट होत आहे.”

“कॅगच्या अहवालामागे नितीन गडकरींचं राजकारण संपवायचं हे कारण”

“नितीन गडकरींविषयी सगळे सांगतात की, स्वच्छ प्रतिमा वगैरे. त्यांची प्रतिमा विकासाची आणि स्वच्छ अशी झाली आहे. त्यामुळे त्यांना बाजूला करून त्यांचं राजकारण संपवायचं हेही एक कारण असू शकतं,” असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.

“केंद्रात सगळीकडे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार”

“कॅगमध्ये भ्रष्टाचार समोर आला आहे. रस्त्यांच्या त्या समितीचे अध्यक्ष स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे या कॅग अहवालावर त्यांची भूमिका काय हा प्रश्न उपस्थित होत आहे. केंद्रात सगळीकडे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. हा अहवाल समोर आल्यावर आता केंद्र सरकार काय कारवाई करतं याकडे आमचं लक्ष आहे,” असंही वडेट्टीवारांनी नमूद केलं.
1

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here