लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रेरणादायी कार्याला जळगावात अभिवादन
साईमत /जळगाव / प्रतिनिधी :
कंजरभाट समाज युवा फाउंडेशन, जळगाव यांच्या वतीने लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. समाजप्रबोधन, समता आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
जयंतीनिमित्त नेरी नाका येथील लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि परिवर्तनवादी कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे आजच्या समाजजीवनातील महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाला समाजाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बिरजू नेतलेकर, विजय दहियेकर, फाउंडेशनचे मुख्य सल्लागार मोहन गारुंगे, अध्यक्ष योगेश बागडे, कार्याध्यक्ष शशिकांत बागडे, सचिव राहुल नेतलेकर, विजय अभंगे, जितू घमंडे यांच्यासह फाउंडेशनचे पदाधिकारी, सदस्य आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांनी साहित्य, लोककला आणि शाहिरीच्या माध्यमातून समाजातील वंचित, शोषित आणि उपेक्षित घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडली. त्यांच्या विचारांतून सामाजिक समतेची प्रेरणा मिळते. त्यांच्या कार्याचा आदर्श समाजातील तरुणांनी स्वीकारून सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमात उपस्थितांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला कृतज्ञतापूर्वक अभिवादन करत त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी समाजात सातत्याने विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प केला. जयंती सोहळा उत्साह, सामाजिक एकात्मता आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
