आरोपींना तात्काळ अटक करण्याची नगरसेवक अरविंद देशमुख यांची मागणी
साईमत/ जळगाव / प्रतिनिधी
अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनीशी संबंधित कोट्यवधी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाने पुन्हा एकदा शहरात चर्चा पेटली आहे. या प्रकरणातील आरोपींना अटकपूर्व जामीन मिळण्याआधीच तात्काळ अटक करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नगरसेवक अरविंद देशमुख यांनी जळगावचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.
या प्रकरणात यापूर्वीच देशमुख यांनी शहर पोलीस ठाण्यात फौजदारी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर महानगरपालिका प्रशासनानेही स्वतंत्रपणे सरकारी फिर्याद नोंदवल्याने प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.
सध्या या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, त्यांना जामीन मिळाल्यास तपास प्रक्रियेत अडथळे निर्माण होण्याची तसेच पुरावे नष्ट होणे किंवा साक्षीदारांवर दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे देशमुख यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.
जळगावकर नागरिकांच्या कष्टाच्या पैशांशी संबंधित हा विषय असल्याने तपास यंत्रणांनी अत्यंत कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. आरोपींना तात्काळ अटक करून तपासाला गती द्यावी आणि जनतेचे कोट्यवधी रुपये परत मिळवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी नमूद केले.
या बैठकीदरम्यान स्थायी समिती सभापती चंद्रशेखर पाटील, विजय जगताप यांचीही उपस्थिती होती. दरम्यान, तपास यंत्रणेला आवश्यक ती सर्व मदत करण्यास आपण तयार असून हा लढा जनहितासाठी पुढेही सुरू ठेवणार असल्याचे देशमुख यांनी ठामपणे सांगितले.
