महापौर दीपमाला काळे यांच्या अचानक पाहणीनंतर मोठी कारवाईचे संकेत उद्यापासून स्वच्छता मोहिमेचा धडाका
साईमत/ जळगाव / प्रतिनिधी
शहरातील व्यापारी केंद्र असलेल्या महात्मा फुले मार्केटच्या दुरवस्थेवर अखेर प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. मंगळवार, ५ मे रोजी महापौर दीपमाला काळे यांनी अचानक मार्केट परिसराची पाहणी करत अस्वच्छता, दुर्गंधी आणि वाढत्या अतिक्रमणाचा प्रत्यक्ष आढावा घेतला. या पाहणीनंतर त्यांनी तातडीने सुधारणा करण्याचे स्पष्ट आदेश प्रशासनाला दिले.
पाहणीदरम्यान मार्केट परिसरात सर्वत्र पसरलेला कचरा, साचलेली घाण आणि अनियंत्रित अतिक्रमणामुळे नागरिकांना आणि पादचाऱ्यांना होणारा त्रास समोर आला. या परिस्थितीवर महापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदारीने काम करण्याचे निर्देश दिले.
महापौरांनी व्यापारी व स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ग्राहकांना भेडसावणाऱ्या अडचणी, वाहतूक कोंडी आणि अस्वच्छतेबाबत त्यांनी थेट माहिती घेत प्रशासनाला त्वरित उपाययोजना करण्यास सांगितले.
“शहराची ओळख स्वच्छता आणि शिस्तीवरून ठरते, त्यामुळे दुर्लक्ष खपवून घेतले जाणार नाही,” असा इशारा महापौरांनी दिला. त्यांनी अधिकाऱ्यांना केवळ कागदोपत्री नव्हे तर प्रत्यक्ष कृतीवर भर देण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
या पाहणीनंतर महापौरांनी उद्यापासून महात्मा फुले मार्केटमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच, रस्त्यांवरील अतिक्रमण हटवून वाहतुकीस आणि ग्राहकांच्या हालचालीस अडथळा ठरणाऱ्या सर्व अडचणी दूर केल्या जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महापौरांच्या या कठोर भूमिकेमुळे मार्केट परिसरात बदलाची अपेक्षा निर्माण झाली आहे. व्यापारी व नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून समाधान व्यक्त केले आहे. मात्र अतिक्रमणधारकांमध्ये या कारवाईबाबत चिंता वाढल्याचे चित्र दिसत आहे.आता प्रशासन ही मोहीम किती प्रभावीपणे राबवते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
