नहाटा चौफुलीवर रचला सापळा; लाचेचे ५ हजार रुपये थेट ‘PhonePe’ वरून ट्रान्सफर!
साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
सावकारी व्यवसायाचा परवाना मंजूर करून देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना भुसावळ येथील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयातील सहकार अधिकाऱ्यासह दोन खाजगी प्रमाणित लेखापरीक्षकांना (ऑडिटर) जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे भुसावळ आणि जळगाव जिल्हा सहकार वर्तुळात प्रचंड खळबळ माजली आहे. १५ जून रोजी भुसावळ येथील नहाटा चौफुली परिसरात हा यशस्वी सापळा रचण्यात आला.
याप्रकरणी सहकार अधिकारी विजय विनायकराव गरूड, खाजगी ऑडिटर सुरेश जनार्दन विपुते (वय ६२) आणि हेमंत प्रकाश काळे (वय ४०) यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डिजिटल लाचखोरी: ५ हजार रुपये थेट ‘PhonePe’ वर!
लाचखोरीच्या या प्रकरणात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. एसीबीच्या पथकाने १५ जून रोजी नहाटा चौफुलीवर सापळा रचून खाजगी ऑडिटर सुरेश विपुते यांना तक्रारदाराकडून ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या रकमेची चौकशी केली असता, सहकार अधिकारी विजय गरूड यांच्या सांगण्यावरून लाचेच्या एकूण रकमेतील ५ हजार रुपये तात्काळ ‘PhonePe’ द्वारे ऑनलाइन ट्रान्सफर करण्यात आल्याचे तपासात उघड झाले. डिजिटल इंडियाचा गैरवापर करत लाच थेट बँक खात्यात वळवल्यामुळे एसीबीचे अधिकारीही चक्रावले आहेत.
तक्रारदाराने भुसावळात सावकारी व्यवसाय करण्यासाठी आवश्यक परवाना मिळावा म्हणून ३० मार्च २०२६ रोजी सहाय्यक निबंधक कार्यालयात रीतसर अर्ज केला होता. हा परवाना मंजूर करण्यासाठी सहकार अधिकारी विजय गरूड यांनी सुरुवातीला २० हजार रुपयांची लाच मागितली होती. तसेच हे काम करून घ्यायचे असल्यास खाजगी ऑडिटर सुरेश विपुते यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी २३ एप्रिल रोजी थेट जळगाव एसीबीकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली.
एसीबीच्या पथकाने केलेल्या गोपनीय पडताळणीत, ऑडिटर सुरेश विपुते यांनी सहकार अधिकारी विजय गरूड, स्वतः आणि दुसरा ऑडिटर हेमंत काळे अशा तिघांच्या वाटणीसाठी एकूण ३० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
”शासकीय कार्यालयात कोणत्याही कामासाठी पैशांची मागणी केली जात असल्यास नागरिकांनी लाच न देता थेट एसीबीशी संपर्क साधावा. भ्रष्टाचार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.”
– एसीबी पथक, जळगाव
ही धडक कारवाई नाशिक परिक्षेत्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत नागरे व त्यांच्या पथकाने केली आहे. तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
