भास्कर जाधवांनी नितेश राणेंना खडसावले

0
2

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी :

गेल्या बारा वर्षांपासून मुंबई -गोवा महामार्ग रखडला आहे. हा महामार्ग केव्हा पूर्ण होणार यासंदर्भात कोकणातील आमदारांनी मंत्री रवीद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांना विविध प्रश्न केले. या मुद्दयांवर शिवसेनेचे (Shivsena)नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) बोलत असताना नितेश राणे (Nitesh Rane) यांनी त्यांना टोला लगावत अडीच वर्षे वाया गेली असे म्हटले. यावर जाधव यांनी संताप व्यक्त करत राणे यांचा चांगलेच सुनावले.

आमदार सुनिल प्रभू यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावर लक्षवेधी मांडली होती. याला उत्तर देतांना चव्हाण म्हणाले डिसेंबर २०२३ पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल. तसेच या कामात भुसंपादन, भौगोलीक स्थिती, माती ढासळणे, न्यायालयीन वाद आदी अडथळे आहेत. त्यात लवकरात लवकर मार्ग काढून काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासनही चव्हाण यांनी दिले.

शेडी घाटात चुकीच्या पद्धतीने काम झाल्याने सभुशीत झालेल्या डोंगराची माती सतत ढासळते आहे. त्यामुळे येथील बारा हजार ग्रामस्थांच्या जीव संकटात आहे. या रस्त्याचे आठ टप्पे केले आहेत. त्यात पनवेल इंदापूर हा टप्पा सार्वजनिक बांधकाम विभाग करणार आहे. उर्वरीत काम राष्ट्रीय महामार्ग करत आहे. याबाबत माजी मंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विविध घोषणा केल्या. मात्र अद्यापही काम करण्यात आले नाही. मुंबईचे चाकरमाने गौरी गणपतीसाठी कोकणात जात आहेत. त्याआधी रस्त्याची अडचण दूर करा, अशी मागणी सभागृहात करण्यात आली.

या मुद्द्यांवर चर्चा सुरू  असताना भास्कर जाधव यांनी या विषयावर सतत प्रश्न उपस्थित केले. या प्रकल्पात बारा वर्ष वाया गेली, असे मंत्री म्हणत असल्याचे जाधव म्हणाले . ते बोलत असताना नितेश राणे यांनी `त्यात मधली अडीच वर्षे वाया गेली` असा शेरा मारला. त्यावर जाधव यांनी मला तुमच्याकडून काहीही सल्ला नको. मी मंत्र्यांशी बोलतो आहे. त्यावर राणे पुन्हा पुन्हा शेरे मारतच होते. तेव्हा मात्र भास्कर जाधव यांनी त्यांना खडेबोल सुनावले. या वादात सभापती राहुल नार्वेकर यांना हस्तक्षेप करावा लागला. या चर्चेत सुनिल प्रभू, रवींद्र वायकर, नितेश राणे, भास्कर जाधव, राजन साळवी, मनीषा चौधरी आदींचा सहभाग होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here