मलकापूर : प्रतिनिधी
तालुक्यातील शिराढोण येथील भारतीय सैन्यदलात सैनिक म्हणून तुषार वसंत ईखारे मागील कित्येक वर्षांपासून कार्यरत आहे. ते घरी सुट्टीवर आले होते. ध्वजारोहणाच्या दिवशी सरपंच आणि उपसरपंच यांनी जातीय द्वेष भावनेतून भारतीय सैनिकाला आमंत्रित न करताच ध्वजारोहण केले. त्यामुळे भारतीय जवान मागासवर्गीय असल्याने ध्वजारोहणापासून वंचित राहिला आहे. त्यामुळे सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंचासह सर्व पदाधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी. जेणेकरून यापुढे ग्रामपंचायतीच्या कार्यालयात कोणत्याही भारतीय सैन्याचा अवमान होणार नाही, असे तक्रारीत म्हटले आहे.
निष्ठापूर्वक देशाची सेवा करीत भारतीय सैनिक तुषार वसंत ईखारे हे शिराढोण येथे रजेवर आले होते. १५ ऑगस्ट रोजी शिराढोण गावात ग्रामपंचायत कार्यालय येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम होता. शिराढोण येथील सरपंच उज्जवला मनीष पाटील, उपसरपंच पद्मिनी रघुनाथ नारखेडे, शारदा वराडे, बादल पाटील, ग्रामसेवक सुरेश राठोड, तंटामुक्तीचे अध्यक्ष सुरेश पाटील, निराजी पाटील, प्रकाश पाटील, विनोद पाटील यांनी मागासवर्गीय समाजाचा असल्याने भारतीय सैनिकाला ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात हेतुपुरस्पररित्या कार्यक्रमात आमंत्रित केले नसल्याची तक्रार तहसीलदार राजेश सुरडकर यांच्याकडे केली आहे.
भारतीय सैनिकाच्या मातेचाही अपमान
देश सेवेच्या महान कार्य माझ्या हातून निरंतरपणे घडत आहे. अप्रत्यक्षरित्या एका भारतीय सैनिकाचा अवमान केला तर याबाबतची विचारणा करण्यासाठी गेल्यावर भारतीय सैनिकाच्या मातेचाही अपमान केला असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. तक्रार देतेवेळी भारतीय सैनिक फौजी तुषार इखारे, चंद्रशेखर झनके, सागर तायडे पोलीस, मुकेश वाकोडे, ॲड.प्रफुल्ल तायडे, ॲड.अजय खरे, पद्मावत तायडे, अश्विनी इंगळे, प्रवीण इंगळे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.