चाळीसगावची केळी निघाली ‘रशियाला’

0
25

जामडीचे शेतकरी दीपक राजपूत यांच्या मेहनतीला २१००ची सलामी

साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी :

शेतकरी आपल्या शेतात राबराब राबतो, मेहनत करतो आणि अन्नधान्य फळे भाजीपाला मेहनतीने पिकवितो. पण त्याला जर योग्य भाव मिळाला नाही तर तो माल कितीही उच्च प्रतीचा असला तरी मायबाप शेतकरी राजाला प्रचंड नुकसान सोसावे लागते. मात्र, त्याच्या मेहनतीचे चीज झाले आणि उत्तम प्रकारचा माल त्याने पिकविला. त्याला चांगला भाव मिळाला तर त्यांच्या आनंदाला पारावर राहत नाही. जामडी येथील प्रयोगशील शेतकरी तथा सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक दीपक राजपूत यांनी मागीलवर्षी आपल्या दोन एकर क्षेत्रात तीन हजार केळीचे रोप लावले होते. त्यांची केळी ‘रशियाला’ निघाली असून त्यांच्या मेहनतीला २१०० ची सलामी मिळाली आहे.

दीपक राजपूत यांनी केळीची चांगली निगा ठेवली. तसेच मशागत चांगली केली. संपूर्ण परिवार शेतात राबला आणि त्यांच्या केळीला साधारण पंचवीस ते बावीस किलो वजन भरेल, असे केळीचे घड लागले आहेत. शिवाय केळी अत्यंत उत्तम प्रतीची असल्यामुळे केळीच्या व्यापाऱ्यांमध्ये तिला चांगली मागणी होऊ लागली. एक्सपोर्ट क्वाॅलिटीची केळी असल्यामुळे दीपक राजपूत यांच्या केळीला २१०० रुपये भाव मिळून व्यापाऱ्यांनी ती कटाईला सुरुवात केली आहे. जवळपास ४० दिवस टिकू शकेल, अशी ही केळी ठरली आहे.

काळ्या आईची सेवा केल्याची मिळाली ‘पावती’

खान्देशची माती तशी केळी उत्पन्नासाठी उत्तमच आहे. परंतु त्यासाठी मेहनत ही अत्यंत महत्त्वाची आहे. दीपक राजपूत यांचे लहान भाऊ, आई-वडील, पत्नी, भावजाई असा सर्व परिवार शेतात राबवून नियमित वेगवेगळे उत्पन्न घेत असतात. त्यांची केळी रशियामध्ये रवाना होत आहे. भाव आणि पैसे मिळत असले तरी आपण एक्सपोर्ट क्वॉलिटीचे उत्तम उत्पादन केल्याचे समाधान संपूर्ण राजपूत परिवाराच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत आहे. कारण तीच काळ्या आईची सेवा केल्याची ‘पावती’ असल्याचे त्यांनी सांगितले. यशस्वी उद्योगाबद्दल सहकारी सह्याद्रीचे दुर्गसेवक दीपक राजपूत यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here