रायपुरच्या सरपंचांवर अपात्रतेच्या कारवाईस टाळाटाळ

0
12

साईमत, रायपूर, ता.जळगाव : वार्ताहर

तालुक्यातील रायपूर येथील ग्रामपंचायतीत १ मे २०२२ रोजी सरपंच रजनी नितीन सपकाळे यांनी ग्रामसभा घेतली नाही. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९चे कलमप्रमाणे अपात्र करावे, अशी मागणी रायपूर येथील मनोज दिलीप परदेशी यांनी केली आहे. त्यांनी अशी लेखी तक्रार जिल्हाधिकारी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, पं.स.चे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे. परंतु कारवाईस संबंधितांकडून मुद्दाम टाळाटाळ होत असल्याचीच तक्रार लोकशाहीदिनात करण्याची वेळ तक्रारदारावर आल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

जळगाव तालुक्यातील रायपूर येथील ग्रामपंचायतीत १ मे २०२२ रोजी सरपंच रजनी सपकाळे यांनी ग्रामसभा घेतली नाही. चौकशी अहवालासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ग्रामपंचायत शाखेने जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, पं.स.चे गटविकास अधिकारी यांना ई-मेलद्वारे दिलेल्या आदेशात चौकशीचा अहवाल १३ डिसेंबर २०२३ पूर्वी सादर करावा, असे म्हटले आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवक आणि मनोज परदेशी यांना १९ जानेवारी रोजी नोटीसद्वारे चौकशीबद्दल कळविले होते. त्यानंतर विस्तार अधिकारी राजेश इंगळे यांनी रायपूर ग्रामपंचायत कार्यालयात चौकशी पूर्ण करुन पंचायत समिती येथे आले. त्यांना भेटून कारवाईबद्दल विचारल्यावर त्यांनी ‘माझ्याकडे दोन तालुके आहेत मला एकच काम आहे का?’ असे उत्तर तक्रारदाराला दिले होते. त्यानंतर ५ फेब्रुवारी २०२४ रोजी लोकशाही दिनात तक्रार करून सरपंच आणि विस्तार अधिकारी अहवाल पाठविण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचे नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here