साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्याबाबतीत एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. अवैध रेती वाहतूक करणाऱ्या एका विनानंबर प्लेटच्या डंपरने रोहिणी खडसे यांच्या अंगावर जाऊन त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. आषाढी एकादशीनिमित्त चिमुकल्या विद्यार्थ्यांची दिंडी सुरू असतानाच हा प्रकार घडल्याने मुक्ताईनगरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दिंडीत थरार; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
मिळालेल्या माहितीनुसार, आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुक्ताईनगर शहरातून शाळकरी विद्यार्थ्यांची वारकरी दिंडी काढण्यात आली होती. या दिंडीतून अचानक एक रेतीचा डंपर मार्ग काढण्याचा प्रयत्न करत होता. चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने रोहिणी खडसे यांनी चालकाला रोखत डंपर थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुजोर डंपरचालकाने वाहन थेट खडसे यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने त्या आणि दिंडीतील विद्यार्थी यातून थोडक्यात बचावले.
‘रेती माफियांना राजकीय संरक्षण!’ – खडसेंचा थेट हल्लाबोल
या घटनेनंतर रोहिणी खडसे यांनी प्रशासकीय यंत्रणेवर सडकून टीका केली आहे. “सरकारी यंत्रणांना हप्ते पोहोचत असल्यामुळेच या रेती माफियांचे धाडस वाढले आहे. बिननंबर प्लेटचे डंपर कोणाच्या आशीर्वादाने रस्त्यावर धावत आहेत?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
”रेती माफियांविरोधात पोलिसांत आणि तहसीलदारांकडे अधिकृत तक्रार दाखल करणार आहे. प्रशासनाकडून कारवाई होईल की नाही याबाबत शंका असली, तरी माझा हा लढा थांबणार नाही.”
— रोहिणी खडसे, महिला प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी (शरद पवार गट)
शहर आणि परिसरातून बिननंबर प्लेटने फिरणाऱ्या सर्व अवैध वाळूच्या वाहनांवर त्वरित कारवाई करावी आणि जर एखादी दुर्घटना घडली तर संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी रोहिणी खडसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यातील अवैध रेती वाहतूक आणि त्याला असणारे राजकीय-प्रशासकीय संरक्षण पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहे.
