नवी दिल्ली
नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान केंद्र सरकार आणि कॉक्रोच जनता पार्टी (CJP) यांच्यातील चर्चेची दुसरी फेरी पार पडली. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांनी सीजेपीच्या शिष्टमंडळाशी सुमारे दोन तास चर्चा केली. या बैठकीत सीजेपीने मांडलेल्या तीन प्रमुख मागण्यांपैकी दोन मागण्या सरकारने तत्त्वतः मान्य केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.
सीजेपीच्या शिष्टमंडळात राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका आणि सौरव दास यांचा समावेश होता.
दोन मागण्या मान्य; राजीनाम्यावर उद्यापर्यंतची मुदत
बैठकीनंतर आशुतोष रांका यांनी माहिती दिली की, आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेणे आणि आत्महत्या केलेल्या नीट उमेदवारांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देणे, या दोन मागण्या सरकारने तत्त्वतः मान्य केल्या आहेत.
मात्र, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर निर्णय घेण्यासाठी सरकारने उद्या दुपारपर्यंतचा अवधी मागितला आहे. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांच्या भवितव्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, उद्याच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उद्या पुन्हा चर्चा होणार — जे. पी. नड्डा
बैठकीनंतर केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी सांगितले की, सीजेपीने तीन प्रमुख मागण्या आणि परीक्षा व्यवस्थेतील सुधारणांसाठी पाच सूचना मांडल्या आहेत. या सर्व मुद्द्यांवर सरकार गंभीरपणे विचार करत असून, उद्या दुपारी पुन्हा बैठक घेऊन पुढील निर्णय कळवला जाईल.
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मिळेपर्यंत आंदोलन कायम!
दरम्यान, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी ठाम भूमिका सीजेपीने पुन्हा स्पष्ट केली आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या पुढील चर्चेकडे देशभरातील विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.
