साईमत, धुळे : प्रतिनिधी
आरोग्याच्या कोणत्याही सोयी सुविधा नसताना अनुभवाच्या जोरावर वयाच्या 90 वर्षात हजार बाळंतपण सुखरुप करण्याची किमया कापडणे येथील फुलाबाई झाल्टे यांनी केली. त्याचा विविध कार्यकारी संस्थेने स्वातंत्र्यदिनी ‘भुलेक पुरस्कार’ देवून सन्मानीत केले. आरोग्याच्या विविध सुविधा निर्माण झाल्या आहेत. शासन जनतेच्या आरोग्याची मोठी काळजी घेत आहे. महिलांचे बाळंतपण म्हणजे बाळासह आईचा पुनर्जन्मच असतो. बहुतेक बाळंतपणे रुग्णालयातच होत आहेत. ज्या काळी या सुविधा नव्हत्या तेव्हा फुलाबार्इंनी एकहाती हजारावर बाळंतपणे केली. सुईणपण निभावताना एकही बालक दगावले नाही. फुलाबाई दिसल्यावर त्यांना नतमस्तक होणारी शेकड्यावर तरुण आहेत. या फुलाबार्इंना वयाच्या नव्वदीत ‘भुलेक सन्मान पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
येथील फुलाबाई झाल्टे यांचे वय वर्षे नव्वद आहे. त्यांना कापडणे विविध कार्यकारी सेवा संस्थेने भूलेक सन्मान पुरस्कार देऊन गौरविले. हा सन्मान सोहळा स्वातंत्र्यदिनी संस्थेच्या सभागृहात झाला. संस्थेचे अध्यक्ष राजा पाटील अध्यक्षस्थानी होते.सरपंच सोनीबाई भिल, उपाध्यक्ष अभिमन माळी, संचालक भटू गोरख पाटील, उज्ज्वल बोरसे, अनिल माळी, शरद पाटील, दिनकर माळी, रवींद्र पाटील, विश्वास पाटील, सुनील पाटील, यशवंत खैरनार, दत्तू माळी, बन्सीलाल पाटील, दिनकर पाटील, प्राचार्य विश्वासराव देसले, छगन पाटील, विलास पाटील, चंद्रकांत पाटील, भय्या पाटील, दादा पाटील, ललित पाटील, विक्की पाटील, योगेश पाटील, महेश पाटील, हरीश पाटील, अमोल पाटील, प्रवीण पाटील आदी उपस्थित होते.
वयाच्या चाळीशीपासून सुईणीचे केले काम
फुलाबाई झाल्टे कापडणेच्या लेक. सासर देवभानेचे होते. तरुणपणात विधवापणाचे जिणे त्यांना आले. माहेरी नव्वद वर्षे निघून गेली. माहेरी अठराविश्व्ो दारिद्य्र होते. मिळेल ते कष्टाचे काम अभिमानाने केले. त्या बाळंतपण करणाऱ्या रेश्मा मावशीच्या संपर्कात त्या आल्या. त्या आज हयात नाहीत. त्या त्याकाळी गावातील एकमेव सुईण होत्या. त्यांच्या मदतनीस म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. रेश्माबाई भामरे थकल्या. सारी जबाबदारी फुलाबार्इंनी उचलली. वयाच्या चाळिशीपासून त्या सुईण म्हणून काम करू लागल्या आहेत.पन्नास वर्षांत हजारावर सुखरूप बाळंतपणे केली. काही व्ोळेस गुंतागुंतही निर्माण झाली. पण बालकासह आईलाही दगावू दिले नाही. त्या रेश्मातार्इंकडून पारंपरिक शास्त्र शिकल्या आहेत. रात्री-अपरात्री दरवाजावर थाप पडली म्हणजे समजायचे, बाळंतपणासाठी आलेत घ्यायला. हातात कंदील घेऊन त्या घरातून बाहेर पडत असत. केवळ बाळंतपणच नाही तर त्या मातेची काळजी घेणारी पारंपरिक आयुर्व्ोदिक औषधेही त्यांनी अनेकांना सुचविलेल्या आहेत.