साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल (प्रायमरी व सेकंडरी) येथे दिंडी सोहळा आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून आषाढी एकादशी अत्यंत भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात पालखी अन् दिंडीत सहभागी होत प्रत्यक्ष वारीचा अनुभव घेतला.
नाटिकेतून वारकरी संस्कृतीचे दर्शन
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी “पंढरीचा पांडुरंग विटेवर का उभा आहे?” या विषयावर आधारित एक विशेष नाटिका सादर केली. या नाटिकेतून वारकरी संप्रदायाचा इतिहास, समृद्ध संत परंपरा आणि भक्तीचा संदेश अतिशय प्रभावीपणे मांडण्यात आला.
शाळेच्या प्राचार्या रेश्मी लाहोटी यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना वारी, पालखी आणि महाराष्ट्राच्या संतपरंपरेचे आध्यात्मिक तसेच सांस्कृतिक महत्त्व पटवून दिले.
हरित पर्यावरणाचा जयघोष
यंदाच्या दिंडी सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे भक्तीसोबत दिलेला पर्यावरण संवर्धनाचा संदेश. दिंडीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी “झाडे लावा, झाडे जगवा” चा जयघोष करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. भक्तीसोबतच निसर्ग रक्षणाची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने स्वीकारली पाहिजे, हा मोलाचा संदेश या माध्यमातून देण्यात आला.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन व प्राचार्य रेश्मी लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर सोनवणे यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
नाटिका संकल्पना: वैशाली दुसाने
प्रास्ताविक: जयश्री कासार
दिवसभर चाललेल्या विठ्ठलनामाच्या जयघोषाने आणि भक्तिरसाने संपूर्ण शाळा परिसर भारावून गेला होता.
