तरवाडे पेठेतील प्राथमिक आरोग्य केंद्रातील भोंगळ कारभाराची चौकशी करुन कारवाईचे आदेश

0
11

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील तरवाडे पेठ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भोंगळ कारभार सुरु होता. तसेच एकाचवेळी सर्व स्टाफ गैरहजर राहत होता. त्यामुळे याबाबत आरोग्य केंद्राची चौकशी करुन कार्यवाही करण्याचे आदेश नाशिक आरोग्य सेवा मंडळाच्या उपसंचालकांनी जळगाव जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत. यासंदर्भात येथील सामाजिक कार्यकर्ते राकेश रामदास निकम यांनी लेखी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीची उपसंचालकांनी दखल घेत कारवाईचे आदेश दिले आहेत.

सविस्तर असे की, तत्कालीन तथा प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी देवराम किसन लांडे यांच्यावर त्यांच्या राहत्या घरी जाऊन धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक प्रतिबंधक विभागाने ५० हजाराची लाच मागितल्याप्रकरणी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता. हेच लांडे गेल्या अनेक वर्षापासून चाळीसगाव तालुका आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकर्त्यांच्या कार्यकाळात अनेक बोगस डॉक्टर फोफावले. त्यामुळे बोगस डॉक्टरांची संख्या चार ते पाच पट झाली. वर्षाकाठी एक ते दोन बंगाली डॉक्टरांवर थातूरमातूर व नाममात्र कारवाई केली जात होती. यासंदर्भात राकेश निकम यांनी ७ जुलै २०२३ रोजी तत्कालीन व प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी देवराम लांडे यांच्याकडे तरवाडे प्रा.आरोग्य केंद्रासंबंधीची तक्रार दिली होती. त्यावेळी लांडे हे प्र. जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून पदावर कार्यरत होते. तक्रार दाखल करून दोन महिने उलटूनही आजतागायत संबंधित तक्रारींवर काही एक कारवाई केली नाही. तसेच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याने निकम यांच्याशी कुठलाही पत्रव्यवहार केला नव्हता.

अधिकाऱ्यांचे कारवाईकडे दुर्लक्ष

तत्कालीन डी.एच.ओ.लांडे तसेच विद्यमान डी.एच.ओ. यांच्या कार्यकर्तृत्वाचा भाग नाही का? प्राथमिक आरोग्य केंद्राविषयी तक्रार आल्यास त्याची तात्काळ दखल घेत चौकशी करत चौकशीअंती वेळीच कारवाई करण्यास का धजावत नाही? आरोग्य विभागातील कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्यास जिल्ह्याभरातील इतर प्रा. आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना यामुळे शिस्त लागत वचक बसेल. परंतु प्रत्यक्षात असे होताना दिसत नाही. शासनाने अधिकाऱ्यांना कारवाईचा अधिकार दिलेला असतानाही हे त्या अधिकाराचा योग्य व कायदेशीर वापर करण्यास धजावत नाही.

अनागोंदी कारभारामुळे तरवाडेचे नागरिक त्रस्त

तरवाडे पेठ येथील नियुक्त मेडिकल ऑफिसर हे इतर तालुक्याला राहतात. तरवाडे येथे मुख्यालयी राहत नाही. तरीही मुख्यालयी राहण्याबाबतच्या घरभाड्याचा मात्र दरमहा लाभ घेत असल्याचे समजते. तरवाडे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा ओपीडी टाइमिंग सकाळी नऊ ते बारा असताना ते कर्तव्यावर मात्र अकरा ते बारा वाजता हजर होत असल्याचे समजते. अशा अनागोंदी आणि सैरभैर कारभारामुळे तरवाडे पंचक्रोशीतील नागरिक त्रस्त झाले आहे. शासन त्यांना पाच आकडी पगार देते. मात्र, मोबदल्यात हे किती वेळ व श्रम देतात? हा मात्र संशोधनाचा विषय ठरत आहे. परंतु कर्तव्यदक्ष उपसंचालक कपिल आहेर यांनी जळगाव जिल्हा आरोग्य अधिकारी यांना याप्रकरणी लेखी पत्रान्वये चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. जर भविष्यात आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र तरवाडे येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कायद्यानुसार कार्यवाही न केल्यास राकेश निकम हे संवैधानिक मार्गाचा अवलंब करत याबाबत न्यायालयात रिट पिटीशन दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here