दरोडा टाकणाऱ्या टोळीचा डाव पोलिसांनी उधळला

0
2

साईमत, धरणगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील पाळधी ते सावदा रस्त्यावरील शेतातील मंदिराजवळ शनिवारी, ९ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता चारचाकी वाहन घेवून दरोडा टाकण्याच्या तयारीत असतांना परप्रांतीय पाच दरोडेखोरांना अटक करण्यात धरणगाव पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर असे की, धरणगाव तालुक्यातील पाळधी ते सावदा गावादरम्यान असलेल्या शिवारातील सप्तश्रृंगी मातेच्या मंदिराजवळ चारचाकी वाहन घेवून काहीजण दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असल्याची गोपनिय माहिती धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उध्दव डमाळे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. शनिवारी, ९ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता पोलिसांनी सापळा रचून परप्रांतीय पाच दरोडेखोरांना शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून बोलेरो गाडी (क्रमांक एमपी ४६ जी ११४७), लोखंडी कुऱ्हाड, सळई, सुताची दोरी, धारदार चाकू, लाल मिरचीची पावडर, पकड यांच्यासह आदी साहित्य मिळून आले.

गाडीत एक लोखंडी कुऱ्हाड, लोखंडी सळई, सुताचा दोर असे साहित्य मिळून आले. त्यानंतर पाच तरुणाची अंगझडती घेतल्यावर एकाच्या कमरेला एक धारदार पाते असलेला चाकू मिळून आला. तसेच दुसऱ्याच्या पॅन्टच्या उजव्या खिशात प्लॅस्टिक पिशवीत लाल मिरचीची पावडर आणि कमरेला पेन्चीस मिळून आली.

असे आहेत अटक केलेले पाच जण

याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये अनिल नेलसिंग भिल (वय २१), नानुसिंग रूपसिंग बारेला (वय २५), जानमन रूमालसिंग बारेला (वय २२), भाईदास पातलिया भिलाला आणि हत्तर गनदा चव्हाण (वय २२, सर्व रा.सेंधवा, जि. बडवाणी, मध्यप्रदेश) अशा पाच जणांचा समावेश आहे. याप्रकरणी पो.हे.कॉ. विजय चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन शिरसाठ करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here