साईमत न्यूज नेटवर्क –
नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील जुनी कामठी परिसरातील मरियम अम्मा दर्ग्यात एका महिलेवर कथितरीत्या धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोलकाता येथील पीडित महिलेच्या तक्रारीवरून कन्हान पोलिसांनी सहा जणांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोलकात्यातील डमडम परिसरात राहणारी महिला एप्रिल महिन्यात मरियम अम्मा दर्ग्यात आयोजित उर्स कार्यक्रमासाठी कामठी येथे आली होती. गेल्या काही वर्षांपासून ती नियमितपणे या धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहत होती. मात्र, यंदाच्या भेटीदरम्यान काही व्यक्तींनी तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप तिने आपल्या तक्रारीत केला आहे.
महिलेने धर्मांतरास नकार दिल्यानंतर तिच्याशी गैरवर्तन करण्यात आले, तसेच मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. १८ ते १९ एप्रिलदरम्यान तिला एका ठिकाणी बळजबरीने रोखून ठेवण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर तिने स्वतःची सुटका करून कोलकात्यात परत जात वैद्यकीय उपचार घेतले व डमडम पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली.
घटना कन्हान पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील असल्याने डमडम पोलिसांनी झिरो एफआयआर नोंदवून प्रकरण कन्हान पोलिसांकडे वर्ग केले. त्यानंतर कन्हान पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. नागपूर पोलिसांचे एक विशेष पथक कोलकात्यात जाऊन पीडित महिलेचा जबाबही नोंदवून आले.
या प्रकरणात ताजी तनविरुद्दीन कलीमउद्दीन (वय ५२), ताजीन मुस्ताफिजुद्दीन तनविरुद्दीन (वय २४) आणि तेजस आनंद खोब्रागडे (वय २४) यांना २९ मे रोजी अटक करण्यात आली आहे. एकूण सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये दोन महिलांचा आणि एका ज्येष्ठ व्यक्तीचाही समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
महिलेच्या तक्रारीनुसार विनयभंग, मारहाण, धर्मांतरासाठी दबाव, धमकी तसेच हत्येच्या प्रयत्नासंदर्भातील कलमांचा समावेश करण्यात आला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता एसआयटीमार्फत तपास सुरू असून काही इलेक्ट्रॉनिक उपकरणेही जप्त करण्यात आली आहेत. या घटनेशी संबंधित आणखी काही बाबी अथवा अशाच स्वरूपाचे इतर प्रकार घडले आहेत का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.
