स्लॅब कोसळला, खांबांना तडे गेले धूम अपार्टमेंटच्या १७० रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर
साईमत /ठाणे / प्रतिनिधी
भिवंडीतील धोकादायक इमारतीचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेची धग अद्याप कायम असतानाच, मुंब्रा परिसरातही धोकादायक इमारतीचा गंभीर प्रकार समोर आला आहे. कौसा भागातील चांदनगर येथील धूम अपार्टमेंटमधील स्लॅबचे प्लास्टर कोसळून इमारतीच्या काही कॉलमला तडे गेल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे इमारतीचा उर्वरित भाग अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ठाणे महापालिका प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या असून, रहिवाशांना इमारत रिकामी करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
मुंब्र्यातील कौसा परिसरातील चांदनगर येथील सानिया हॉलजवळ असलेल्या धूम अपार्टमेंटमध्ये हा प्रकार घडला. इमारतीतील स्लॅबचे प्लास्टर अचानक कोसळल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिका प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.
शनिवारी दुपारी सुमारे ३ वाजून ५१ मिनिटांच्या सुमारास या घटनेची माहिती महापालिका प्रशासनाला मिळाली. त्यानंतर सहाय्यक आयुक्त विजय कावळे यांच्यासह अतिक्रमण विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच मुंब्रा प्रभाग समितीच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने इमारतीची सखोल पाहणी केली असता, काही कॉलमला तडे गेल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन तातडीची खबरदारी घेण्यात आली.
धूम अपार्टमेंट ही तळमजला अधिक पाच मजली इमारत असून, तिचे बांधकाम अंदाजे २० वर्षांपूर्वी झाले आहे. ठाणे महापालिकेच्या वर्गीकरणानुसार ही इमारत सी-१ प्रवर्गातील म्हणजेच अत्यंत धोकादायक इमारतींच्या श्रेणीत येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. स्लॅबचे प्लास्टर कोसळल्यानंतर इमारतीच्या संरचनेवर परिणाम झाल्याचे स्पष्ट झाले असून, उर्वरित भागही धोकादायक बनला आहे.
या इमारतीमध्ये एकूण ४२ सदनिका आहेत. त्यापैकी सध्या २२ सदनिकांमध्ये कुटुंबे वास्तव्यास असून, सुमारे १६० ते १७० नागरिक या धोकादायक इमारतीत राहत आहेत. त्यामुळे या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे मोठे आव्हान महापालिका प्रशासनासमोर निर्माण झाले आहे.
महापालिका प्रशासनाने रहिवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत मुंब्रा प्रभाग समितीमार्फत इमारत तातडीने रिकामी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. धोकादायक इमारतीत राहणे टाळावे आणि सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच पुढील आवश्यक कार्यवाही मुंब्रा प्रभाग समिती आणि बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
दरम्यान, भिवंडी दुर्घटनेनंतर ठाणे जिल्ह्यातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जुन्या आणि धोकादायक इमारतींची तपासणी करून संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, धोकादायक इमारतींमधील रहिवाशांचे सुरक्षित स्थलांतर हे प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरत आहे
